जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:48 PM2024-06-11T14:48:08+5:302024-06-11T14:48:32+5:30

BJP New President: सप्टेंबर महिन्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, तोपर्यंत जेपी नड्डा पक्षाचे काम पाहतील.

BJP New President: JP Nadda's term ends; BJP national president to be elected soon; 'These' names are in discussion | जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...

जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...

BJP New President: लोकसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत जेपी नड्डा (JP Nadda) अध्यक्षपदी राहतील, असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच, आगामी चार महिन्यांसाठी जेपी नड्डांच्या खांद्यावर आरोग्य मंत्रालयासह पक्षाची धुरा असणार आहे.

जेपी नड्डा यांची जानेवारी 2020 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपला, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता नड्डांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे पक्षाला लवकरच दुसरा पूर्णवेळ अध्यक्ष पाहावा लागणार आहे. 

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ही नावे 
नड्डा मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, या शर्यतीत अनेकांची नावे आहेत. यातील एक नाव म्हणजे विनोद तावडे. तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेले तावडे हे बीएल संतोष यांच्यानंतरचे सर्वात प्रभावी सरचिटणीस मानले जातात. याशिवाय, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांचेही नाव या शर्यतीत आहे. लक्ष्मण तेलंगणातील असून, सध्या भाजपचे या राज्यावर विशेष लक्ष आहे. विशेष म्हणजे, सुनील बन्सल यांचेही नाव या शर्यतीत आहे. सध्या ते पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या तीन राज्यांचे प्रभारी आहेत.
 

Web Title: BJP New President: JP Nadda's term ends; BJP national president to be elected soon; 'These' names are in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.