मध्य प्रदेशात गमावलेल्या जागांवर दिग्गज नेत्यांना भाजपाकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:00 PM2023-09-26T12:00:39+5:302023-09-26T12:01:03+5:30
मध्य प्रदेशात भाजपची रणनीती
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील संभाव्य पराभवाचे विजयात रुपांतर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते, चार विद्यमान खासदार गणेश सिंह, रीती पाठक, उदय प्रताप सिंह, राकेश सिंह आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना तिकीट दिले आहे.
मध्य प्रदेशातील २० वर्षांच्या सत्तेमुळे तयार झालेला सत्ताविरोधी वातावरण आणि संभाव्य पराभवाचा धोका ओळखून भाजपने सोमवारी आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. मध्य प्रदेशात भाजपच्या सहा मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना विधानसभेची तिकिटे देण्यात आली आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री तोमर यांना दिमनी येथून, पटेल यांना नरसिंहपूरमधून, कुलस्ते यांना निवासमधून आणि विजयवर्गीय यांना इंदूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे खासदार गणेश सिंह यांना सतना, रीती पाठक यांना सिधी, राकेश सिंह यांना जबलपूर पश्चिम आणि उदय प्रताप सिंह यांना गदरवाडामधून तिकीट देण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने या सर्व जागा मोठ्या फरकाने गमावल्या होत्या. भाजपने आपले तगडे उमेदवार उभे करून या सर्व जागा जिंकण्याचा निर्धारच व्यक्त केला आहे.
दुसऱ्या यादीतही शिवराज नाहीत
भाजपच्या दुसऱ्या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना तिकीट मिळाले नाही. सर्व सत्ताविरोधी वातावरणाचे मुद्दे देखील चौहान यांच्याशी संबंधितच असल्यामुळे भाजपला निवडणुकीत अडचणी येत आहेत.