भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटींची ऑफर; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 10:54 AM2017-07-31T10:54:44+5:302017-07-31T11:06:19+5:30
भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपवर करण्यात आला.
बंगळुरू, दि. 31- गुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं होतं. या आमदारांची त्या रेसॉर्टमध्ये रविवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसकडून भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले. भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपावर करण्यात आला.
'भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली. आमचे आमदार इथे मजा-मस्ती करण्यासाठी आलेले नाहीत, तर आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये आणून ठेवलं आहे. गुजरात राज्यसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून मनी-मसल्स पावरचा वापर करून आमदारांना विकत घ्यायचे प्रयत्न सुरू होते, असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि गुजरातचे आमदार शक्तीसिंह गोहिल म्हणाले आहेत. आम्ही एकमताने पक्षासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला असून भाजपाला लोकशाहीचा अंत करू देणार नाही, असंही गोहिल म्हणाले आहेत. गुजरात काँग्रेसमधील गळती थांबविण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 2 आमदार वैयक्तिक आणि राजकीय कारण सांगून गुजरामध्ये परत आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दोन आमदार परत माघारी गेल्यानंतर राहिलेल्या 42 आमदारांना माध्यमांसमोर हजर करण्यात आलं. यावेळी या आमदारांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला.
यावेळी गांधीनगरमधील दाहेगममधील आमदार कामिनीबेन बी राठोड यांनीही भाजपवर आरोप केलेय. मलाही भाजपने 15 कोटींची ऑफर दिली होती पण ती ऑफर नाकारल्याचं कामिनीबेन राठोड यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकलं आहे.
पटेल जिंकणार नाहीत?
राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडला असतानाच काँग्रेसचे एक ज्येष्ठ आमदार आणि शंकरसिंह वाघेला यांचे निकटवर्तीय राघवजी पटेल यांनी म्हटलं , अहमद पटेल यांच्यासाठी निवडणूक जिंकणे कठीण आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे आणखी २० आमदार पक्ष सोडतील. राघवजी पटेल यांनीही आपण राजीनामा देऊन भाजपात सहभागी होणार असल्याचे सूचित केले. सात आमदारांच्या एका गटाने मात्र त्यांच्यासोबत बंगळुरूला न जाण्याचा निर्णय घेतला. यात वाघेला आणि त्यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना तिथे हलविले आहे.
उत्तर प्रदेशात सपाच्या दोन, बसपाच्या एका आमदाराचा राजीनामा
उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपाच्या एका विधान परिषद सदस्याने शनिवारी राजीनामा दिला. सभापती रमेश यादव यांनी सांगितले की, सपाचे आमदार बुक्कल नवाब आणि यशपाल सिंह तसेच बसपाचे ठाकूर जयवीर सिंह यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी लखनौ दौºयावर असतानाच तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच मंत्री सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना विधानसभा वा परिषदेवर निवडून आणणे गरजेचे आहे. योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा स्वतंत्र देव सिंह आणि मोहसिन रझा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
या घटनाक्रमामुळे आता योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढविण्याची गरज पडणार नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतील. अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या की, भाजपाला सत्तेच्या रक्ताची चटक लागली आहे. मणिपूर, गोवा, बिहार व आता गुजरातनंतर उत्तर प्रदेश यातून हेच दिसत आहे.
काँग्रेसचा आरोप
गुजरात राज्य काँग्रेसचे प्रमुख भरत सोळंकी यांनी सांगितले की, भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवीत आहेत. त्यामुळे आमचे आमदार एकजुटीने बंगळुरूला गेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आमदारांना पैशांच्या जिवावर शिकार करू पाहणाºया भाजपाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी खटला दाखल करावा.