नितीश कुमारांचं सरकार पाडण्यासाठी लालूंची भाजपाला ऑफर - सुशील मोदी
By admin | Published: July 3, 2017 09:34 AM2017-07-03T09:34:47+5:302017-07-03T10:49:49+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - ""बेहिशेबी संपत्ती प्रकरणात भाजपाने मदत केली तर बिहारमधील नितीश कुमार यांचं सरकार पाडण्यासाठी आपण भाजपाला मदत करू, अशी ऑफर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दिली होती"", असा गौप्यस्फोट भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी केला आहे. ""इकॉनॉमिक टाइम्स""ला दिलेल्या मुलाखतीत सुशील मोदी यांनी हा दावा केला आहे.
मुलाखतीदरम्यान सुशील मोदी म्हणाले की, ""पहिल्या दिवसापासून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातील युती यशस्वी झाल्याचे दिसत नाही. त्यांचे विचारही जुळत नाहीत. गेल्या 17 महिन्यांमध्ये त्यांच्या सरकारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. अंर्तगत वादांमुळे त्यांचे सरकार आतापर्यंत एकही मंडळ किंवा आयोग स्थापन करू शकले नाही. तर 9 महिन्यांपासून राज्यातील असंख्य बदल्या रखडल्या आहेत. कारण लालूंना स्वतःच्या मर्जीनं अनेक अधिका-यांची नियुक्ती करायची आहे. मला नितीश कुमार यांची कार्यपद्धती माहिती आहे. त्यांचे कधीही लालूंसोबत जुळून येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा, सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी यांसारख्या मोठ्या निर्णयांना नितीश कुमार यांनी समर्थन दर्शवले. याद्वारे त्यांनी काँग्रेसला जो इशारा द्यायचा तो दिला"".
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आयकर विभागानं लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात केलेल्या कारवाईत चार मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. यातील तीन मालमत्ता लालू यांचे पुत्र तेजस्वी यांच्या आहेत. तर लालूंची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती यांना दिल्लीतील बिजवासन येथील बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आयकर विभागाने चौकशीसाठी 6 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, मिसा भारती यांनी त्यांच्या वकिलांना पाठवले होते. यावेळी मिसा भारती यांना गैरहजर राहिल्यानं 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. शिवाय आयकर विभागाने 16 मे रोजी दिल्ली आणि गुरुग्राम येथील लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते.