भाजपाची शिवसेनेला 'मोठ्ठी' ऑफर; उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 10:53 AM2018-04-04T10:53:10+5:302018-04-04T10:53:10+5:30
संसदेतील एक मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपाश्रेष्ठी तयार असून त्यांनी तसा पर्याय शिवसेना नेतृत्वापुढे ठेवला आहे.
नवी दिल्लीः येत्या वर्षभरातील सगळ्या मोठ्या निवडणुका लक्षात घेऊन, प्रत्येक पाऊल जपून टाकणाऱ्या भाजपानं आता मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न सुरू केलेत. त्याचाच भाग म्हणून, गेल्या तीन-चार वर्षांत दुखावलेल्या आणि दुरावलेल्या शिवसेना या आपल्या जुन्या मित्राला खूश करण्यासाठी त्यांनी राज्यसभेतील एका मोठ्या पदाची 'ऑफर' दिल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतं.
राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपतोय. गेली ४१ वर्षं हे पद काँग्रेसकडे आहे. पण आता राज्यसभेत अव्वल नंबरचा पक्ष ठरलेल्या भाजपाला हे पद विरोधकांकडे जाऊ द्यायचं नाही. हे मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपाश्रेष्ठी तयार आहेत. त्यांनी तसा प्रस्ताव 'मातोश्री'वरही कळवला आहे. तो स्वीकारायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय स्वाभाविकच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. त्यांचा होकार किंवा नकार पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा असल्यानं त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. संजय राऊत, राजकुमार धूत आणि अनिल देसाई यांच्यात संजय राऊत सर्वात अनुभवी आहेत. त्यामुळे शिवसेनेनं भाजपाचा प्रस्ताव स्वीकारल्यास या मानाच्या पदावर त्यांची वर्णी लागू शकते, असं बोललं जातंय. शिवसेनेने प्रस्ताव नाकारल्यास हे पद भाजपा स्वतःकडेच ठेवेल. त्यांनी भूपेंद्र यादव यांचं नाव जवळपास निश्चित केल्याचं समजतं.
दोन दशकांहून अधिक काळाची भाजपा-शिवसेनेची युती २०१४ मध्ये संपुष्टात आली होती. तेव्हापासून, एकेकाळचे हे सच्चे दोस्त, पक्के दुश्मन होऊन गेलेत. केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत शिवसेना सत्तेत आहे, पण त्यांच्यात सातत्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. दोन्हीकडचे नेते एकमेकांचा पाणउतारा करण्यासाठी आतूरच असतात. 'सामना'तून रोजच्या रोज नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जातात. अगदी आजच्या अग्रलेखातही पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आलंय. देश तोडण्याचा प्रयत्न होत असताना मोदी कुठे आहेत?, असा सवाल शिवसेनेनं केलाय.
गेले तीन-साडेतीन वर्षं हाच सिलसिला सुरू असताना, शिवसेना-भाजपातील छत्तीसचा आकडा सर्वज्ञात असताना, गेल्या दोन आठवड्यांपासून चित्र थोडं वेगळं दिसतंय. शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सूतोवाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतंच केलं होतं. त्यानंतर आता, शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापतीपदाची ऑफर देऊन भाजपाने त्यांना आणखी गोंजारण्याचा प्रयत्न केलाय.