बुलडोझर कारवाईत भाजपाचं कार्यालय जमीनदोस्त; कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:49 IST2024-12-18T11:45:31+5:302024-12-18T11:49:09+5:30
उत्तर प्रदेशात बुलडोझर कारवाई नेहमी चर्चेत राहते. अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आक्रमकपणे बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचं काम करते. त्याचा फटका भाजपा कार्यालयालाही बसला आहे.

बुलडोझर कारवाईत भाजपाचं कार्यालय जमीनदोस्त; कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही हैराण
बलिया - उत्तर प्रदेशातील बलिया इथं भाजपाच्या कॅम्प कार्यालयावर नगरपालिका प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय हटवण्याची सूचना प्रशासनाने दिली होती. मागील आठवडाभरात दोन वेळा जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन कारवाईसाठी तिथे गेले होते परंतु भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांच्या विरोधामुळे कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत होते. अखेर मंगळवारी हे कार्यालय प्रशासनाने जमीनदोस्त केले आहे.
याबाबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंह यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, मी पक्षाच्या कामानिमित्त जिल्हा कार्यालयात गेलो होतो तेव्हा प्रशासनाने आपलं कार्यालय तोडलं असा निरोप कार्यकर्त्यांनी दिला. कारवाईआधी आम्हाला नोटीस दिली नव्हती असा दावा त्यांनी केला. त्याशिवाय गेल्या ४ दशकापासून आमचे कार्यालय आहे. समाजवादी पक्षाच्या काळात हे कार्यालय तोडले तेव्हा आम्ही धरणे आंदोलनाला बसलो होतो. त्यानंतर आठवडाभरात प्रशासनाने हे कार्यालय पुन्हा बांधून दिले. आता या कारवाईनंतर योगी सरकारविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त करत 'हमे तो अपनो ने लूटा गैरो मै कहा दम था' अशा शब्दात खंत व्यक्त केली आहे.
त्याशिवाय हे कार्यालय तोडण्यामागच्या लोकांना असं वाटतं की मी मोठा नेता बनू नये. बलिया मतदारसंघाची उमेदवारी मागू नये. ४० वर्ष मी विरोधकांशी लढतोय. मी घाबरणारा नाही असंही जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र सिंह म्हणाले. तर ज्याठिकाणी हे कार्यालय होते तिथे पार्क बनवले जाणार आहे. ही जागा आधीपासून पार्कसाठी निश्चित केली होती. सोमवारपर्यंत आम्ही त्यांना कार्यालय हटवण्याची नोटीस दिली होती परंतु त्यांनी ते हटवले नाही म्हणून कारवाई केली असं बलिया नगरपालिकेचे अधिकारी सुभाष कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, संभलमध्येही प्रशासनाकडून बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली आहे. इथं वीजेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली. याठिकाणी ४६ वर्ष बंद पडलेले जुने मंदिर आढळून आले तेव्हा प्रशासनाने ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीस पाठवून संबंधित बांधकाम हटवण्यास सांगितले अन्यथा बुलडोझर एक्शन घेऊ असा इशारा दिला होता.