भाजपाची अधिकृत वेबसाईट केली हॅक; मोदींविषयी झळकविला आक्षेपार्ह व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:45 AM2019-03-06T04:45:06+5:302019-03-06T04:45:56+5:30
भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅक करण्यात आली.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅक करण्यात आली. या कृत्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. भाजपाच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कर यांचा एक व्हिडीओ झळकविण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्यानंतर काही वेळातच भाजपाच्या वेबसाईटच्या देखभालीचे काही काम सुरू असल्याने सध्या त्यावरील मजकूर पाहाता येणे शक्य नाही, असा अॅडमिनने दिलेला संदेश वेबसाईटवर क्लिक केल्यावर अनेकांना पाहायला मिळाला.
भाजपाची वेबसाईट हॅक झाल्याचे टिष्ट्वट काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाच्या प्रभारी दिव्या स्पंदना यांनीही केले. भाजपाची वेबसाईट हॅक झाल्यानंतर त्यावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसत होता. मात्र काही वेळानंतर ही वेबसाईट पूर्णपणे बंदच पडली. २६ डिसेंबर १९९५ रोजी भाजपाची ही अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली होती. १० आॅक्टोबर २०१८नंतर ही वेबसाईट अपडेट करण्यात आली नव्हती. तिच्यावर हॅकर्सचा हल्ला आजवर झालेला नव्हता मात्र छत्तीसगढ भाजपाची वेबसाईट २० फेब्रुवारी रोजी हॅक करण्यात आली होती.
>सरकारी वेबसाईटवरही झाला होता सायबर हल्ला
गुजरात काँग्रेसची वेबसाईटही २१ फेब्रुवारी रोजी हॅक करून त्यावर आक्षेपार्ह गोष्टी झळकविण्यात आल्या होत्या. हे कृत्य भाजपाच्याच लोकांनी केले असावे असा आरोप त्यावेळी त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या काही खात्यांच्या वेबसाईट एकाच वेळी बंद पडल्या होत्या. त्या वेबसाईटवर चिनी भाषेतील अक्षरे दिसत होती. त्यामुळे हे चिनी हॅकरचेच कृत्य असावे असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र संगणकीय प्रणालींतील त्रुटींमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण सरकारने त्याबाबत केले होते. जानेवारी महिन्यात
नॅशनल सिक्युरिटी गार्डची वेबसाईट पाकिस्तानातून हॅक करण्यात आली होती. २०१७ साली केंद्रीय गृह खात्याच्या वेबसाईटवरही सायबर हल्ला झाला होता.