भाजपामध्ये जुने ते सोने; हिमाचलमध्ये प्रेमकुमार धुमल, कर्नाटकात येडीयुरप्पांचेच नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:55 AM2017-11-04T00:55:23+5:302017-11-04T00:55:32+5:30
भाजपाने दिग्गज नेत्यांना सक्रिय राजकारणापासून बाजूला ठेवल्यानंतर आणि काही नेत्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यानंतर ७५ वर्षांच्या वयोगटातील नेत्यांना पक्षात पुन्हा पदे देण्याची तयारी सुरू झाली आहे. भाजपाने यू-टर्न घेत हिमाचलमध्ये ७४ वर्षांच्या प्रेमकुमार धुमल यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपाने दिग्गज नेत्यांना सक्रिय राजकारणापासून बाजूला ठेवल्यानंतर आणि काही नेत्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यानंतर ७५ वर्षांच्या वयोगटातील नेत्यांना पक्षात पुन्हा पदे देण्याची तयारी सुरू झाली आहे. भाजपाने यू-टर्न घेत हिमाचलमध्ये ७४ वर्षांच्या प्रेमकुमार धुमल यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही वयोमर्यादेची अट बाजूला सारून कर्नाटकात बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासोबत गुरुवारी ‘नव कर्नाटक परिवर्तन यात्रे’ला हिरवा झेंडा दाखविला. येडीयुरप्पा जानेवारीत ७५ वर्षे पूर्ण करणार असून, कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका मे २०१८मध्ये होणार आहेत.
कर्नाटकातील पदयात्रेची जबाबदारी येडीयुरप्पा यांच्यावर आली आहे. तीन महिने चालणाºया या पदयात्रेची सांगता पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण, येडीयुरप्पा यांच्याकडेच कर्नाटकची सूत्रे राहतील, असे संकेत भाजपाने दिलेच आहेत.
हिमाचलसाठी प्रेमकुमार धुमल व कर्नाटकात येडीयुरप्पा यांचे नेतृृत्व यातून वयोमर्यादेचा निकष दूर पडला आहे.
राज्यसभेतील ७५ वर्षांवरील एका भाजपा सदस्याने सांगितले की, ज्येष्ठांचा कसा उपयोग करून घ्यावा यावर पक्षाने पर्यायी तंत्र शोधावे. कारण, या ज्येष्ठ नेत्यांनी आयुष्यभर फक्त पक्षाचे काम केलेले
आहे. त्यामुळे असे वाटते की,
पक्षात ७५ वर्षांवरील नेत्यांना एकच मापदंड लावण्यात येणार नाहीत. कारण, आता पक्षात ‘ओल्ड इज गोल्ड’ ठरत आहे.
पंचाहत्तरी केवळ येथेच नडते!
गुजरातेत माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (७५) यांना वयाच्या कारणास्तव पदावरून दूर केले गेले. मात्र अमित शहा यांच्याशी असलेला संघर्ष हे खरे कारण होते. मोदींच्या पाठिंब्यामुळे त्या काही काळ पदावर राहिल्या. पण ७५ वर्षे पूर्ण होताच, ते कारण सांगून त्यांनी पद सोडत असल्याचे म्हटले होते.
पक्षाने लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळावर घेतले. पण, ४२ महिन्यांत एकदाही बैठक झाली नाही. जोशी यांनीच हे ‘लोकमत’ला सांगितले. पक्षात ७५ वर्षांवरील १२ खासदार आहेत. त्यांनी सुरुवातीपासून पक्षात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या नेत्यांना महत्त्वाचे काम देण्यात आले नाही आणि मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याचाही निर्णय घेतला.
नजमा हेपतुल्ला, कलराज मिश्रा यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. पक्षात कार्यकर्ते व नेत्यांना हे नियम स्वीकारण्यास तयार केले जात नाही, तोपर्यंत ते निरर्थकच ठरतात. ‘आम्हाला बे्रन डेड घोषित करण्यात आलेले आहे,’ अशी टीका अलीकडेच यशवंत सिन्हा यांनी केली आहे.