"माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 10:42 AM2021-11-09T10:42:12+5:302021-11-09T11:02:11+5:30

BJP P Muralidhar Rao : मुरलीधर राव यांनी "माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी" असं म्हटलं आहे.

BJP P Muralidhar Rao says bjp will be for everyone on question of seeking vote in nake of castes | "माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

"माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली - मध्य प्रदेश भाजपाचे राज्य प्रभारी पी. मुरलीधर राव (BJP P Muralidhar Rao) हे नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपा नेत्याने वादग्रस्त विधान केलं असून यामुळे राजकारण तापलं आहे. पी. मुरलीधर राव यांनी "माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी" असं म्हटलं आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी टीकास्त्र सोडलं आहे. वादानंतर मात्र आता भाजपा नेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे. याच दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील जोरदार टीका करत निशाणा साधला आहे. 

प्रसारमाध्यमांनी भाजपा हा कधी ब्राह्मण-वाण्यांचा पक्ष होता, तर कधी एससी, एसटी, ओबीसींचा पक्ष, असे का? तसेच आपण विकासाच्या गप्पा मारतो, मात्र जातीच्या नावावर मते का मागितली जातात? असा प्रश्न मुरलीधर राव यांना विचारण्यात आला होता. त्यावर राव यांनी "माझ्या एका खिशात ब्राह्मण, दुसऱ्या खिशात वाणी आहेत. आता प्रश्न विचारला आहे, तर उत्तर ऐका. माझ्या व्होट बँकेत, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, माझ्या नेत्यांमध्ये ब्राह्मण आहेत, म्हणून त्याला ब्राह्मणांचा पक्ष म्हटले गेले. वाणी आहेत म्हणून वाण्यांचा पक्ष म्हटले" असं उत्तर दिलं आहे.

"पक्ष सर्वांसाठी सुरू केला होता, पण माझ्याकडे त्यावेळी काही विशिष्ट वर्गातील लोक जास्त होते, त्यामुळे तुम्ही म्हणता की हा पक्ष त्यांचा आहे. आपण सर्वांचा पक्ष बनवण्याचे काम करत आहोत" असंही पी मुरलीधर राव यांनी म्हटलं आहे. राव यांच्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मुरलीधर राव यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत माफी मागण्याची मागणी केली.

कमलनाथ यांचं भाजपावर टीकास्त्र, माफी मागण्याची केली मागणी 

कमलनाथ यांनी "हे भाजपाचे मध्य प्रदेशचे प्रभारी मुरलीधर राव आहेत, जे म्हणत आहेत की माझ्या खिशात ब्राह्मण आणि एका खिशात वाणी आहेत’ त्या वर्गाचा हा काय आदर आहे? याच प्रभारींनी यापूर्वी भाजपाच्या चार-पाच वेळा खासदार-आमदारांना अपात्र म्हटलं आहे. त्यांच्या माजी नेत्याने क्षत्रिय समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी या दोन्ही समाजांची माफी मागावी" असं म्हटलं आहे. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर पी मुरलीधर राव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: BJP P Muralidhar Rao says bjp will be for everyone on question of seeking vote in nake of castes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.