संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकट्या मोदींचा समजू नका..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:56 PM2023-12-07T12:56:01+5:302023-12-07T13:12:59+5:30
संसद भवन संकुलात ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. संसद भवन संकुलात ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, तीन राज्यांमध्ये मिळालेले मोठे यश हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे, हा एकट्या मोदींचा विजय समजू नका, असे संसदीय बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, विश्वकर्मा योजनेवर भर देत नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व खासदारांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ती कमी करावी. केंद्रीय योजनांबाबत सर्व खासदारांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे. संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून स्वत:ही मैदानात उतरावे, असेही ते म्हणाले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले, तेव्हा मोदी-मोदी आणि भारत माता की जयच्या घोषणा देत सभागृहात त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप खासदारांनी जवळपास तीन मिनिटे टाळ्या वाजवून नरेंद्र मोदींचे स्वागत केले होते. दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजप संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
आजच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी पोहोचले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सर्व खासदारांनी त्यांचे भव्य स्वागत केले. तसेच, यावेळी भाजप खासदारांनी उभे राहून टाळ्या वाजवून 'स्वागत है भाई स्वागत है, मोदी जी का स्वागत है'च्या घोषणा दिल्या. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पंतप्रधानांचे पुष्पहार घालून स्वागत केले. दरम्यान, या भाजपच्या संसदीय बैठकीत पक्षाचे सर्व लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य उपस्थित असतात. साधारणत: अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते, मात्र या आठवड्यात ही बैठक मंगळवारी होऊ शकली नाही.