जम्मू काश्मीरमध्ये भाजपा नेत्याने ठेवली गोमांस पार्टी
By admin | Published: September 13, 2015 11:53 AM2015-09-13T11:53:18+5:302015-09-13T11:53:18+5:30
जम्मू काश्मीरमध्ये गोमांस बंदी सक्तीने लागू करावी असे आदेश हायकोर्टाने दिले असतानाच आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेच गोमांस पार्टीचे आयोजन केले आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १३ - जम्मू काश्मीरमध्ये गोमांस बंदी सक्तीने लागू करावी असे आदेश हायकोर्टाने दिले असतानाच आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेच गोमांस पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही समाजातील नागरिकांना बोलवणार असून मुस्लिमांना गोमांस दिले जाईल तर हिंदूंना शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. दोन्ही समाजात बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी या पार्टीचे आयोजन केल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे.
दक्षिण काश्मीरमधील भाजपा नेते खुर्शिद अहमद मलिक यांनी रविवारी गोमांस (बीफ) पार्टीचे आयोजन केले आहे. बंधुत्व व धर्मनिरपक्षतेचा संदेश देण्यासाठी अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन केल्याचे मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर हायकोर्टाने गोमांस बंदी सक्तीने लागू करण्याचे आदेश स्थानिक सरकारला दिले असून मुस्लिम समाजाने यावर आक्षेप घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे धर्मात हस्तक्षेप असल्याचे मुसलमानांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या पार्टीसाठी पक्षाची परवानगी घेतली का असा सवाल विचारला असता मलिक म्हणाले, मी पक्षात मुस्लिमांचा विकास करण्यासाठी आलो आहे. मी मस्जिदमध्ये जावं की नाही हे मी पक्षाला विचारु का ?, या पार्टीचे पक्षाशी काहीही देणेघेणे नाही असे मलिक यांनी स्पष्ट केले.