भाजपाच पुरवतंय एमआयएमला पैसा, ममता बॅनर्जींचा औवेसींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 01:45 PM2019-11-19T13:45:16+5:302019-11-19T15:09:42+5:30
बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असुदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएम पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. औवेसींचे नाव न घेता, बॅनर्जी यांनी भाजपा आणि एमआयएम एकच असल्याचं म्हटलंय. तसेच, भाजपाकडून एमआयएम पक्षाला पैसा पुरवला जातो, असा आरोपही त्यांनी केला. बंगालमधील कूचबिहार इथे तृणमूल काँग्रेसची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये बोलत असताना ममता यांनी नाव न घेता AIMIM पक्षावर सडकून टीका केली.
बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी भाजपासह असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाला लक्ष्य केलं. अल्पसंख्यांक समाजाने असदुद्दीन ओवेसींसारख्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हणत ममता यांनी एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचं सूचवलंय. ओवेसी यांचे नाव न घेता ममता यांनी त्यांच्यावर टीका केली. हैदराबादवरून इकडे येऊन ते सभा घेतात. येथे येऊन अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा दावा करतात. पण, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे म्हणत अल्पसंख्यांक समाजाला आपल्यासोबत राहण्याचे आवाहन केलंय. तसेच, हिंदू समाजातील लोकांनीही टीएमसीसोबत राहावे, कट्टरपंथींयांसमवेत जाऊ नये, असे ममतांनी म्हटले.