भाजप-पीडीपीत पुन्हा ठिणगी
By admin | Published: April 10, 2015 01:21 AM2015-04-10T01:21:34+5:302015-04-10T09:08:03+5:30
सरकार स्थापनेपासूनच वेगवेगळ्या कारणांवरून मतभेदांमुळे चर्चेत आलेल्या जम्मू-काश्मिरातील सत्ताधारी युतीतील सहकारी भारतीय जनता पक्ष (
जम्मू/नवी दिल्ली : सरकार स्थापनेपासूनच वेगवेगळ्या कारणांवरून मतभेदांमुळे चर्चेत आलेल्या जम्मू-काश्मिरातील सत्ताधारी युतीतील सहकारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी)यांच्यात काही मुद्यांवर मतैक्य नसल्याचे गुरुवारी पुन्हा उघड झाले. काश्मिरी विस्थापित पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन केली जाणार नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी स्पष्ट केले, तर या मुद्यावर केंद्राच्या भूमिकेत कुठलाही बदल झाला नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी ठासून सांगितले. त्यामुळे युतीत आणखी एक वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
काश्मिरातून विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांनी खोऱ्यात परत यावे, अशी आमची मनापासून इच्छा आहे; परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र वसाहती वसविण्याची आपल्या सरकारची कुठलीही योजना नाही, असे सईद यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले.
सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे उचलण्यात येत असलेल्या पावलांना कडाडून विरोध केला. तेव्हा विरोधकांच्या गदारोळातच सईद यांनी उपरोक्त ग्वाही दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर दोन दिवसांनी सईद यांनी हे वक्तव्य केले आहे. या बैठकीनंतर गृहमंत्रालयातर्फे जारी निवेदनात राज्य सरकार विस्थापित काश्मिरी पंडितांच्या स्वतंत्र वसाहतीसाठी भूसंपादन करून त्यांना जमीन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले होते.
जम्मू-काश्मिरातील मुख्य विरोधी पक्ष आणि फुटीरवादी गटांनी यावर कडाडून टीका केली होती. राज्यातील जनतेत फूट पाडण्याचा हा कट असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला होता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोऱ्यात गाझासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी इस्रायलचे अनुकरण करीत असल्याचा दावा फुटीरवाद्यांनी केला होता. मुख्यमंत्री सईद यांनी मात्र आपण असे कुठलेही आश्वासन दिले नसल्याचा दावा केला आहे. काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, अशा प्रकारचे वाद निर्माण झाल्यास ते कसे परततील? घाईगर्दीत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. सर्व पक्षांना सोबत घेतले जाईल. काश्मिरात धर्मनिरपेक्षतेचे फुल फुलावे अशी आमची इच्छा आहे. या मुद्याचे राजकारण करू नका. त्यामुळे काश्मीरची बदनामी होते, असे आवाहन सईद यांनी फुटीरवाद्यांना केले. (वृत्तसंस्था)