ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे मुस्लीम कार्ड; अमित शाह यांची नवी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 10:16 AM2018-05-07T10:16:21+5:302018-05-07T10:16:21+5:30
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणूकांचे मतदान १४ मे रोजी होणार आहे. या राज्यात मुस्लिमांचे प्रमाण ३०% आहे.
कोलकाता- त्रिपुरा जिंकल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या रडारवर आता पश्चिम बंगाल आहे हे लपून राहिलेले नाही. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळेस भाजपाच्या अमित शाह यांनी तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देत प्रचारसभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत व २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा या राज्यात जनाधार वाढल्याचे दिसले. पण पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पश्चिम बंगालच्या स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाने मुस्लीम कार्ड खेळण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणूकांचे मतदान १४ मे रोजी होणार आहे. या राज्यात मुस्लिमांचे प्रमाण ३०% आहे. त्यांच्या मोठ्या वोटबँकेवर ममता बॅनर्जी यांचे राजकारण उभे होते. मात्र या वोटबँकेला हादरा देण्यासाठी भाजपाने राज्यभरात ८५० पेक्षा जास्त मुस्लीम उमेदवार उभे केले होते. गेल्या म्हणजे २०१३ सालच्या निवडणुकीत भाजपाने १०० हून कमी अल्पसंख्यांकांना तिकीट दिले होते. मात्र आता इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांना तिकीट दिल्याने अमित शाह यांनी प्रत्येक राज्यातील निवडणुकीचे आडाखे व नियम वेगवेगळे असतात हे मान्य करुन पावलं टाकल्याचे दिसून येते. केवळ भाषणाच्यावेळेस अजान सुरु झाल्यावर भाषण थांबवून प्रतिकात्मक वर्तन करण्याएेवजी भाजपाने यावेळेस कृती करुनच आपण अल्पसंख्यांकांच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला असावा. भाजपाने आजवर पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्यांकाना एवढी मोठी संधी कधीच दिली नव्हती. भाजपाच्या या अनपेक्षित खेळीने ममतांच्या तृणमूलने सावध प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झाले तरी मुस्लीम मतदार ममता बॅनर्जी यांच्यामागेच उभे राहातील असे त्या पक्षाने स्पष्ट केले आहे. तृणमूलचे नेते पार्था चॅटर्जी यांनी भाजपावर टीका करताना म्हटले, " भाजपा मुस्लिमांना तिकिटे देत आहे आणि दंगलीही घडवत आहे."
भाजपाने मुर्शिदाबाद, माल्दा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, दक्षिण २४ परगणा, वीरभूम या जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांना सर्वाधिक संंधी दिली आहे. याबाबत बोलताना भाजपाच्या कुचबिहार जिल्ह्यातील उमेदवार रेश्मा परविन म्हणाल्या, " तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांनी आजवर आमचा वोटबँक म्हणून वापर केला, मात्र भाजपाचा विश्वास विकासावर आहे."