BJP PM Candidate: आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच असणार पंतप्रधानपदाचे उमेदवार; अमित शहांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:29 PM2022-08-01T12:29:36+5:302022-08-01T12:29:57+5:30
बिहारच्या पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली, यावेळी अमित शहा बोलत होते.
2024 Lok Sabha Election: 2024च्या लोकसभा निवडणुकासाठी (LokSabha Election 2024) अजून बराच काळ बाकी आहे. पण, अनेक पक्षांनी यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपकडून नरेंद्र मोदीच (Narendra Modi) पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहे. पण, कधी-कधी मोदी निवृत्त होऊन इतरांना संधी देतील, अशी दबक्या आवाजात चर्चा असते. पण, आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीच नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
बिहारच्या पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व आघाड्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपानिमित्त बोलताना अमित शाह म्हणाले की, '2024 मध्ये भाजप-जेडीयू एकत्र निवडणुका लढवतील आणि नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.' यावेळी अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीची भावना देशभर नेण्यासाठी शाहंनी कार्यकर्त्यांना 9 ते 12 ऑगस्ट असे चार दिवस समर्पित करण्यास सांगितले आहेत. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांना 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू करणयाचे निर्देशही देण्यात आल्याचे ते म्हणाले. या बैठकीला केरळ, तामिळनाडू, मिझोराम आणि मेघालय यासारख्या दूरच्या राज्यांसह देशभरातील 600 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.