भाजपकडून २०२४ ची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलावली भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:03 AM2023-06-09T10:03:52+5:302023-06-09T10:06:21+5:30
नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधानांनी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली बैठक प्रदीर्घ काळ चालली होती.
संजय शर्मा, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी दिल्लीत ११ जूनच्या सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. याच दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी स्वतंत्रपणे बोलावण्यात आले आहे.
२८ मे रोजी नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधानांनी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली बैठक प्रदीर्घ काळ चालली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी, हा या बैठकीचा अजेंडा होता. यानंतर केवळ १२ दिवसांतच अशा प्रकारची दुसरी बैठक पंतप्रधानांनी बोलावली आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, ११ जून रोजीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी सर्व राज्यांचे सर्व्हे अहवाल समोर ठेवून सर्व भाजप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. सुशासन, सरकारी योजनांची अंमलबजावणी, सामाजिक समीकरण, सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद, नवीन मतदारांना विशेष करून युवकांना आकर्षित करण्याच्या विषयांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधानांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना जेथे भाजपचे सरकार नाही, त्या अन्य एका राज्याची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील मतभेद दूर करणार
- मध्य प्रदेशच्या निवडणूक सर्व्हेच्या अहवालाने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये मध्य प्रदेश सर्वांत मोठे राज्य आहे.
- तेथे भाजप पुन्हा सत्तेत येऊ इच्छित आहे; परंतु २० वर्षांची अँटी इन्कम्बन्सी आणि १८ वर्षांपासूनच्या शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्याबाबत कार्यकर्त्यांमधील निराशा पाहून आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व काही परिवर्तन करण्याची तयारी दाखवत आहे.
- प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशासाठी नवीन निवडणूक प्रभारी नियुक्त करण्याचे तसेच गटबाजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशच्या भाजप नेत्यांना एकत्र बसवून मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.