योगींच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेगा प्लॅन; साधू-संतांसह डॉक्टर, इंजिनीअर सहभागी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:05 AM2022-03-21T11:05:42+5:302022-03-21T11:08:21+5:30
Yogi Adityanath`s oath-taking ceremony : योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संविधानाची शपथ घेणार आहेत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये 37 वर्ष जुना विक्रम मोडणारे योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी भाजपने मोठा प्लॅन तयार केला असून, सर्व तयारीही करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संविधानाची शपथ घेणार आहेत.
उत्तर प्रदेश भाजपाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना शपथविधीसाठी सूचना पाठवल्या आहेत. सूचनांनुसार, प्रत्येक भागातील किमान 2 कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या 24 तास आधी घटनास्थळी पोहोचतील. खासदार, आमदार, महापौर, सभापती यांची यादी तयार करून लखनऊला पाठवण्याच्या विशेष सूचना देण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी खासदार, आमदार आणि पक्षाकडून ये-जा करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या शपथविधीमध्ये साधू-संतांसह डॉक्टर, इंजिनीअर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
सर्व जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते पक्षाचा झेंडा वाहनात लावून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा मुख्यालय आणि बाजारपेठेत होर्डिंग्ज लावण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत. यासोबतच शपथविधीला येण्यापूर्वी मंदिरांमध्ये सकाळी 8 ते 10 या वेळेत पूजा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शपथविधीसाठी येणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांना प्रवेशपत्र मिळेल. तसेच, या कार्यक्रमाला जवळपास 1 लाख लोक जमण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्व बड्या नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्याची योजना आहे. एक मोठा स्टेज असेल आणि त्यासमोरील इकना स्टेडियममध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.
यांची खास उपस्थिती राहणार...
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्र सरकारचे मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एवढेच नाही तर या शपथविधी सोहळ्यात देशातील नामवंत उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांशिवाय यावेळी भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनाही बोलावले जात आहे.
विरोधी नेत्यांनाही आमंत्रण
याचबरोबर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपा प्रमुख मायावती, सपा नेते मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे.