भाजप ७० चा फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत; राजनाथ सिंहांसह ५६ नेते 'आऊट' होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:17 PM2024-01-11T13:17:50+5:302024-01-11T13:18:13+5:30
भाजपा अधिकाधिक जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. २०१९ मध्ये ४३७ जागांवर भाजपने निवडणूक लढविली होती.
एकीकडे काँग्रेस आणि इंडीया आघाडी जागा वाटपावरून रस्सीखेच खेळत असताना दुसरीकडे भाजपा आपल्याच मातब्बर नेत्यांना धक्का देण्याची तयारी करत आहे. भाजपा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी तरुण आणि महिला नेत्यांवर डाव लावू शकते. सुत्रांनुसार भाजपा ७० वर्षांवरील नेत्यांना घरी बसविण्याची तयारी करत आहे. जर असे झाले तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांपासून ते व्ही के सिंहांपर्यंत ५६ नेते लोकसभेच्या रेसमधून बाहेर पडणार आहेत.
भाजपा अधिकाधिक जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. २०१९ मध्ये ४३७ जागांवर भाजपान निवडणूक लढविली होती. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भाजपा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. १५० ते १६० जागांवर उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
पक्षाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर आपल्या नेत्यांसाठी वयासह अन्य नियम बनविण्यात येतील. भाजपने 2019 मध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या 303 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. एका नेत्याने सांगितले की, 10 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळेस भाजप त्या जागांवर विशेष लक्ष देत आहे, ज्या त्यांना कधीही जिंकता आलेल्या नाहीत. निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यामागेही पक्षाची रणनीती आहे. याचाच फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाला. अशा स्थितीत लोकसभेतही त्याचीच पुनरावृत्ती पक्षाला करायचा विचार आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवाराचे नाव जाहीर केल्याने पक्षाचा फायदा तर होतोच शिवाय उमेदवारांना कमकुवत भागावर लक्ष केंद्रीत करण्याची संधी मिळते.