अमित शहांनी 34 दिवसात केला 57000 किलोमीटर प्रवास, असा जिंकला कर्नाटकचा किल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 11:09 AM2018-05-17T11:09:52+5:302018-05-17T11:09:52+5:30
कर्नाटक विधानसभेसाठी अमित शहा दिवस-रात्र मेहनत करत होते.
नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने 104 जागा आपल्या नावे केल्या. बहुमतापासून काही जागा दूर असल्या तरीही कर्नाटकात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. यासाठी कर्नाटकता भाजपाने बरीच मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 15 मे) रोजी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मेहनत व पक्षासाठीची एकनिष्ठता म्हणून अमित शहांचं उदाहरण दिलं होतं. कर्नाटक विधानसभेवर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यावेळी अमित शहा दिवस-रात्र मेहनत करत होते. अमित शहा कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 34 दिवस कर्नाटकात होते. पक्षातील सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी 28 जिल्ह्यात 57 हजार 135 किलोमीटरचा प्रवास केला. अमित शहा यांनी निवडणुकीसाठी फार पूर्वीच आराखडा तयार करून ठेवला होता. त्यांनी एकूण ५९ सभा आणि २५ रोड शो केले.
अमित शहा यांनी प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा एक नेता नेमून त्याच्याकडून वेगवेगळ्या पातळ्यावरून काम करून घेतलं. या नेत्याकडून त्यांनी मतदारांची विस्तृत माहिती घेतली. तसेच मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली. त्यांनी बुथ पातळी आणि जिल्हा पातळीवर ‘जाहीरनामा अधिवेशन’ आयोजित करून तो कार्यकर्त्यांना समजावून सांगितला.
लिंगायत समाजातीला लोकांची मत मिळविण्यासाठी अमित शहा यांनी विविध मठांना भेटी दिल्या. पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर टीका होत नव्हती. त्यावेळी अमित यांनी थेट सिद्धरामय्यांवरच हल्लाबोल केला.