ओखी चक्रीवादळाचा राजकीय सभांना फटका, अमित शहा यांच्या गुजरातमधील 3 रॅली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 12:33 PM2017-12-05T12:33:54+5:302017-12-05T12:36:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका राजकीय सभांना बसला आहे.
अहमदाबाद- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका राजकीय सभांना बसला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी भागात थैमान घालणारं ओखी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे गुजरातकडे सरकत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमधील नियोजित राजुला, महुवा आणि शिहोर येथील निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत.
BJP President Amit Shah's public rallies in Rajula, Mahuva and Shihor cancelled due to #CycloneOckhi (file pic) #Gujaratpic.twitter.com/gH8BnTVoFT
— ANI (@ANI) December 5, 2017
ओखी चक्रीवादळाचे परिणाम मुंबई आणि कोकणामध्ये दिसून येत आहेत. वादळाचा परिणाम म्हणून सध्या मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. यापूर्वी या वादळाने तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे थैमान घातलं होतं. ओखीमुळे या राज्यांचं मोठं नुकसान झालं होतं.
ओखी चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडू राज्यातील २२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यामुळे लक्षद्वीपमध्ये भूस्खलनही झालं होतं. केरळ आणि तामिळनाडूतील सुमारे 900 पेक्षा अधिक मच्छिमार या वादळामुळे समुद्रात अडकून पडले होते. त्यानंतर सिंधुदूर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर ते सुरक्षितरित्या पोहोचलं.
ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. मंगळवारीही सकाळपासून पाऊस सुरू आहे.