भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची २०२४ साठी नवी टीम जाहीर; बंदी संजय, राधा मोहन अग्रवाल नवे राष्ट्रीय सरचिटणीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:44 PM2023-07-30T14:44:16+5:302023-07-30T14:45:51+5:30
शनिवारी ३८ सदस्यांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या घोषणेबरोबरच हीच टीम २०२४ची सार्वत्रिक निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : यावर्षीच्या प्रारंभी जानेवारीमध्येच दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षीय कार्यकाळ २०२४पर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून नड्डा यांच्या नव्या टीमची प्रतीक्षा केली जात होती. शनिवारी ३८ सदस्यांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या घोषणेबरोबरच हीच टीम २०२४ची सार्वत्रिक निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले. नड्डा यांच्या या टीममध्ये संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हेच असतील व सह संघटनमंत्री शिव प्रकाश हेच आहेत.
या टीममध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व रमण सिंह यांना पुन्हा राष्ट्रीय उपाध्यक्ष करून स्पष्ट संकेत दिले आहेत की, राजस्थान व छ्त्तीसगढमध्ये भाजप नवीन नेतृत्व देईल व या दोन अनुभवी नेत्यांना राज्याऐवजी केंद्रातील राजकारण करावे लागेल. हाच संदेश झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवरदास यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्ष करून दिला आहे.
छत्तीसगढच्या दोन महिला नेत्या सरोज पांडे व लता उसेंडी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. छ्त्तीसगढमध्ये प्रदीर्घ काळापासून सक्रिय असलेले सौदान सिंह यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्यात आली आहे.
बंदी संजय यांना अलीकडेच तेलंगणा प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. त्यांना किशन रेड्डी यांच्या जागी मोदी मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी आधी चर्चा होती. परंतु त्यांना संघटनेत पाठवून मंत्री होण्याच्या मार्गावर विराम लावण्यात आला आहे.
राधा मोहन अग्रवाल यांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे विधानसभेत अनेकदा नेतृत्व केलेले आहे. ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अतिशय जवळचे मानले जातात. त्यांनी आपला राजीनामा देऊन योगी आदित्यनाथ यांच्यासाठी जागा रिकामी केली होती. सध्या ते राज्यसभेत खासदार आहेत.
विनोद तावडे, कैलाश विजयवर्गीय, अरुण सिंह, तरुण चुग, दुष्यंत गौतम, सुनील बन्सल यांना पुन्हा राष्ट्रीय महासचिव केले आहे. लक्ष्मीकांत वाजपेयी यांना उत्तर प्रदेशातील महत्त्वाचा ब्राह्मण चेहरा मानले जाते. त्यांना मोदी मंत्रिमंडळात सहभागी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे. सध्या ते भाजपचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद आहेत. ते उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत.
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे निकटवर्तीय सत्य कुमार यांना पुन्हा राष्ट्रीय सचिव करण्यात आले आहे. बसपातून भाजपमध्ये आलेले नोएडा येथील सुरेंद्र सिंह नागर यांना राष्ट्रीय सचिव केले आहे. अरविंद मेनन यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सचिव करण्यात आले आहे.
गुजरातचे सह प्रभारी राहिलेले सुधीर गुप्ता यांना सह कोषाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी उत्तराखंडचे नरेश बन्सल यांना सह कोषाध्यक्ष करण्यात आले आहे. कोषाध्यक्ष पदावर बरेली येथील राजेश अग्रवाल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
जे. पी. नड्डा यांच्या या टीममध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ राष्ट्रीय महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, एक संघटनमंत्री, एक राष्ट्रीय कोषाध्यक्ष व एक सहकोषाध्यक्ष आहे.
तारीक मन्सूर राष्ट्रीय उपाध्यक्ष
- अलीगढ मुस्लिम विद्यापाठाचे माजी कुलगुरू तारीक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करून पसमांदा मुस्लिमांना मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. केरळमधील मुस्लिम नेते अब्दुल्ला कुट्टी यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्ष करून मुस्लिमांना संदेश देण्यात आलेला आहे.
- दिलीप सैकिया यांनाही राष्ट्रीय महासचिव पदावरून हटवले आहे. ते आसाम सोडून बाहेर सक्रिय होत नव्हते व त्यांचे काम दिसत नव्हते. या दोघांच्या जागी बंदी संजय व राधामोहन अग्रवाल यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले आहे.