भाजपने शांतता, विकासाला प्राधान्य दिले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:04 AM2021-03-23T05:04:40+5:302021-03-23T05:05:01+5:30
काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे.
जोनाई : भाजपने गत पाच वर्षांत आसाममध्ये शांती आणि विकास यावर भर दिला, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी एका सभेला संबोधित करताना व्यक्त केले. येथे एका सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आंदोलन, हिंसाचार, बॉम्बस्फोट, लोकांचे मृत्यू, संचारबंदी अशा घटना घडत होत्या. दहशतवाद वाढत होता.
अमित शहा म्हणाले की, काँग्रसचे नेते राहुल गांधी आसामच्या अस्मितेच्या रक्षणाबाबत बोलतात पण, आज मी त्यांना जाहीरपणे विचारू इच्छितो की, एआययूडीएफचे प्रमुख बदरूद्दीन अजमल यांनासोबत घेऊन काँग्रेस हे सर्व करू शकेल काय. जर अजमल सत्तेत आले तर आसाम घुसखोरांपासून सुरक्षित राहील काय.
आसामी आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली
राज्यात आणखी घुसखोर येऊ द्यायचे का. त्यांनी असाही दावा केला की, काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे. या निवडणुकीत लोकांना हे ठरवायचे आहे की, त्यांना शांतता आणि विकास हवा आहे की, नको.