EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:37 PM2024-06-16T15:37:16+5:302024-06-16T15:38:54+5:30
Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे.
Elon Musk On EVM: देशभरात निवडणुकीच्या मतदारानासाठी ईव्हीएम मशीन वापरले जाते. विरोधक सातत्याने ईव्हीएम मशीनवरून केंद्र सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेकदा यावर स्पष्टीकरण देऊन विरोधकांना त्यांचे दावे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. यातच आता जगातील सर्वांधिक श्रीमंतांपैकी एक तसेच टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. इलॉन मस्क यांनी शंका घेतल्यानंतर आता भाजपाच्या एका नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी ज्युनिअर यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आहे. प्युर्टो रिको येथील निवडणुकीदरम्यान EVMमधील गडबडीविषयी त्यांनी सविस्तर शब्दांत आपले मत मांडले आहे. तसेच प्युर्टो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. ही गडबड लागलीच लक्षात आली. त्यानंतर मतदार, मतदान यांचा पडताळा करण्यात आला. सर्व काही ठीक झाले, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. याच पोस्टवर इलॉन मस्क यांनी मत व्यक्त केले आहे. इलॉन मस्क प्रभावशाली व्यक्ती असून, त्यांनी एखादी भूमिका मांडल्यानंतर त्याची जगभर चर्चा होते. इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय निवडणुकांकडे पाहिले जात आहे.
इलॉन मस्क नेमके काय म्हणाले?
रॉबर्ट एफ केनडी ज्युनिअर यांच्या एक्सवरील पोस्टला इलॉन मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. इलॉन मस्क म्हणतात की, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काढून टाकायला हव्यात. एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. तसेच याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यानंतर भाजपाचे नेते राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राजीव चंद्रशेखर यांनी दिले प्रत्युत्तर
इलॉन मस्क यांची टिप्पणी वरवरची आहे. कुणीच सुरक्षित हार्डवेअर करू शकत नाही का? मला वाटते हे साफ चुकीचे आहे. इलॉन मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल. पण भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. आमच्या यंत्रात ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट यासारखी कोणतीही कनेक्टिव्हीटीची सुविधा नाही. भारतासारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात. एलॉन मस्कला सांगू इच्छितो की, हवं तर आम्ही त्यांसाठी शिकवणी वर्ग घेऊ शकतो, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर यांच्या या उत्तरावर इलॉन मस्क यांनी रिप्लाय करत, काहीही हॅक केले जाऊ शकते, अशी टिपण्णी केली.
दरम्यान, यावर पुन्हा एकदा राजीव चंद्रशेखर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या तुमचे बरोबर आहे. काहीही शक्य आहे उदा. क्वॉन्टम कंप्यूटसह, मी कोणत्याही स्तरावरील एन्क्रिप्शन डिक्रिप्ट करू शकतो, लॅब लेव्हल टेक आणि भरपूर संसाधनांसह, मी जेटच्या काचेच्या कॉकपिटच्या फ्लाइट कंट्रोल्ससह कोणतेही डिजिटल हार्डवेअर/सिस्टम हॅक करू शकतो. पण ईव्हीएम सुरक्षित आणि कागदी मतदानाच्या तुलनेत विश्वासार्हतेचा एक वेगळा प्रकार आहे. आणि आम्ही असहमत असण्यास सहमती देऊ शकतो, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.