Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:22 PM2024-05-23T14:22:51+5:302024-05-23T14:30:47+5:30
Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह बुधवारी निवडणूक प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले. याच दरम्यान त्यांना चांदीचा मुकुट घालण्यात आला, त्यावर त्यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर हा मुकुट विकून काही गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा. उत्तर-पश्चिम दिल्लीतून भाजपाने योगेंद्र चंदोलिया यांना तिकीट दिलं आहे, ज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी राजनाथ सिंह हे आले आणि त्यांनी जनतेला संबोधित केलं.
राजनाथ सिंह बुद्ध विहारमध्ये पोहोचले आणि भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांनी राजनाथ यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना चांदीचा मुकुट देण्यात आला. मात्र, काही वेळाने ते म्हणाले, "मी सर्वांना विनंती करतो की, निवडणुकीनंतर मला घातलेला हा चांदीचा मुकुट विकून टाका आणि गरीबाची मुलगी, जिचं लग्न होत आहे तिच्यासाठी पैंजण बनवा."
"केजरीवालांमुळे वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदा ऐकलं"
जनतेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "आम्ही वर्क फ्रॉम-होम आणि वर्क फ्रॉम-ऑफिस बद्दल खूप ऐकलं होतं, पण केजरीवालांमुळे आम्ही वर्क फ्रॉम जेलबद्दलही पहिल्यांदा ऐकलं. केजरीवाल यांच्या आधी भारतातील कोणत्याही मुख्यमंत्री भ्रष्टाचार प्रकरणात जेलमध्ये गेलेला नाही. ते जेलमध्ये आणि तेथून सरकार चालवणार असल्याचं म्हणाले."
"एनडीएने 400 जागा पार करणार"
"केवळ भारतातच नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो." केजरीवाल यांच्याबाबत ते पुढे म्हणाले की, "ते म्हणायचे की ते सरकारी घरात राहत नाहीत, पण आता ते शीशमहलमध्ये राहतात. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांची इंडिया आघाडी चालणार नाही."