पोटनिवडणूक निकालांनी भाजपा, राजेंना दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:30 AM2018-02-03T01:30:13+5:302018-02-03T01:30:43+5:30
सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणूक हरणे तसे धक्कादायकच. विशेषत: राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे ना सरकारमध्ये काही फरक पडतो ना विरोधी लोकप्रतिनिधीकडून कामे करून घेणे शक्य होते.
नवी दिल्ली - सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणूक हरणे तसे धक्कादायकच. विशेषत: राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे ना सरकारमध्ये काही फरक पडतो ना विरोधी लोकप्रतिनिधीकडून कामे करून घेणे शक्य होते. तरीही अजमेर व अलवरच्या मतदारांनी लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला निचडून देणे भाजपाला अडचणीचे ठरणार आहे.
या राज्यांत काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपासाठी ही धोक्याची घंटाच मानले जात आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कारभाराविषयी लोकांत नाराजी आहे की, भाजपावर राग आहे, हे या निवडणुकांतून स्पष्ट झाले नसले तरी, विधानसभा निवडणुका भाजपाला सोप्या जाणार नाहीत, असे मात्र उघड आहे. या पोटनिवडणुकांच्या निकालांचे परिणाम काँग्रेस व भाजपच्या मनोधैर्यावर व सत्ता समीकरणांवर परिणाम करणारे आहेत. स्वत: वसुंधरा राजे यांनी या पोटनिवडणुकांत प्रचार केला होता. काही आठवडे त्यांनी मतदारसंघात घालवले होते. तब्बल २४ मंत्री भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी तिथे मुक्काम ठोकून होते. त्यामुळे ते या पराभवाची जबाबदारी टाळू शकत नाहीत. ज्या फरकाने पराभव झाला त्यावरून सरकारविरोधात जवळपास लाट असल्याचे दिसते. वसुंधरा राजे या लोकप्रिय नसून नेतृत्वात बदल व्हावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील अनेकांना वाटते. भाजपमध्ये ज्या गटाला राजे यांचे नेतृत्व नको आहे, त्यांना या पराभवाने बळ मिळेल. राजे यांना राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार
सुरू झाल्यावर या पराभवामुळे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. त्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांचे नीतिधैर्यही कमी होईल. (वृत्तसंस्था)
काँग्रेसमध्ये पुन्हा सत्तास्पर्धा?
हे पराभव मोदी सरकार व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला चांगलाच झोंबणारे आहेत. या तिन्ही विजय म्हणजे काँग्रेसला व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना मोठा उत्साह देणारे आहेत. मात्र या विजयानंतर पायलट व माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात पक्षांतर्गत सत्तास्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.