UP Election 2022 : "योगी आदित्यनाथांनी मथुरेतून लढावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा"; भाजपा नेत्याचं जेपी नड्डांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 03:03 PM2022-01-03T15:03:41+5:302022-01-03T15:11:14+5:30

CM Yogi Adityanath And UP Election 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

bjp rajyasabha mp harnath singh yadav writes jp nadda requesting to fiel up cm yogi adityanath from mathura | UP Election 2022 : "योगी आदित्यनाथांनी मथुरेतून लढावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा"; भाजपा नेत्याचं जेपी नड्डांना पत्र

UP Election 2022 : "योगी आदित्यनाथांनी मथुरेतून लढावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा"; भाजपा नेत्याचं जेपी नड्डांना पत्र

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रचारसभांना वेग येत असून, सर्वपक्षीयांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच मुख्य अजेंडा या निवडणुकीसाठी विरोधकांचा असल्याचे बोलले जात आहे. यातच आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. योगी आदित्यनाथ प्रथमच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भाजपा खासदाराने याच दरम्यान आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मथुरा विधानसभा मतदारसंघातून उभे करण्याची विनंती पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. उत्तर प्रदेश राज्यसभेचे सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी नड्डा यांना यासंदर्भात पत्र लिहीलं आहे. जर पक्षाने योगी आदित्यनाथ यांना मथुरेतून उमेदवारी दिली तर संपूर्ण राज्य आणि देशातील जनतेला आनंद होईल. योगींनी मथुरेतून लढावे अशी भगवान कृष्णाची इच्छा आहे. हे पत्र लिहिण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने प्रेरित केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

"मथुरा या शहरातून निवडून देण्याची विशेष इच्छा"

"योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल, पण मी तुम्हाला अत्यंत नम्र शब्दांत विनंती करतो की, त्यांना मथुरा या शहरातून निवडून देण्याची विशेष इच्छा आहे" असं हरनाथ सिंह यादव यांनी पत्रात लिहिलं आहे. तसेच हे पत्र लिहिण्यासाठी मला स्वतः भगवान श्रीकृष्णाने प्रेरित केले आहे असं देखील म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नंतर विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले. त्यांनी आतापर्यंत एकदाही विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यावर्षी निवडणूक लढवल्यास ती त्यांची पहिली विधानसभा निवडणूक ठरेल, असे म्हटले जात आहे. 

"मी कुठून निवडणूक लढवायची हे पक्ष नेतृत्व ठरवेल"

योगी आदित्यनाथ निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, कोणत्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी मिळेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, माझ्या निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही शंका नाही. पण मी कुठून निवडणूक लढवायची हे पक्ष नेतृत्व ठरवेल. कोणत्याही जागेला माझी वैयक्तिक पसंती नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. भाजपाच्या तीनशेहून अधिक जागा येतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. दरम्यान, आम्ही आश्वासन दिलेल्या सर्व गोष्टी आम्ही केल्या. असे कोणतेही काम उरले नाही ज्यासाठी मला पश्चात्ताप वाटेल. आमच्या जनविश्वास यात्रा सुरू आहेत. यानंतर राज्यात अधिक चांगले वातावरण पाहायला मिळेल, असेही योगी आदित्यनाथ म्हणालेत.
 

Web Title: bjp rajyasabha mp harnath singh yadav writes jp nadda requesting to fiel up cm yogi adityanath from mathura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.