ललित मोदी वादात भाजपा राजेंच्या पाठीशी
By admin | Published: June 27, 2015 02:48 AM2015-06-27T02:48:53+5:302015-06-27T02:48:53+5:30
भारतीय जनता पार्टीने ललित मोदी प्रकरणात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळली असून
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने ललित मोदी प्रकरणात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळली असून, पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसने राजे हटाव मोहीम तीव्र केली असतानाच भाजपाचे सचिव श्रीकांत शर्मा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, की राजे या राजस्थानातील आमच्या दिग्गज नेत्या असून, काँग्रेसकडून आमच्या लोकप्रिय नेत्यांना लक्ष्य बनविण्यात येत आहे; परंतु आम्ही एकजुटीने त्यांच्यासोबत आहोत.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर शर्मा यांनी हे वक्तव्य केले. या प्रकरणाची कायदेशीर बाजू आणि राजकीय परिणामांसह या वादाच्या विविध पैलूंवर जेटली यांनी चर्चा केल्याचे समजते. नंतर जेटली भाजपाध्यक्ष अमित शहा यांनाही भेटले.
राजे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना अडचणीत आणणाऱ्या या वादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने डावपेचांची आखणी उभय नेत्यांनी या वेळी केल्याचे समजते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)