मिशन @ २०२४ : पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचणार भाजप, उद्यापासून स्नेह संवाद यात्रा काढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:18 PM2023-07-26T15:18:49+5:302023-07-26T15:41:14+5:30
भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीपासून २७ जुलैपासून पसमांदा स्नेह संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधक सरकारविरोधात एकवटत आहेत, तर दुसरीकडे भाजप आपली ताकत वाढवण्यावर भर देत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लीम समुदायामध्ये आपली पोहोच वाढवण्यासाठी सुचवले आहे. याची दखल घेत भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीपासून २७ जुलैपासून पसमांदा स्नेह संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयापासून पसमांदा स्नेह संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. पहिल्या दिवशी ही यात्रा भाजप मुख्यालयापासून सुरू होईल आणि पक्षाचे माजी नेते सिकंदर बख्त यांच्या समाधीवर जाईल, जिथे त्यांना पुष्पहार अर्पण केला जाईल.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सय्यद यासिर अली जिलानी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, १ ऑगस्टपासून ही यात्रा दिल्लीच्या तुर्कमान गेटपासून सुरू होईल आणि दिलशाद गार्डन मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करेल. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर प्रदेशामध्ये असणार आहे. जौनपूर, आझमगड आणि देवरियामार्गे ही यात्रा बिहारमध्ये दाखल होईल. ही यात्रा दुसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये आयोजित केली जाईल आणि नंतर किशनगंज मार्गे पश्चिम बंगालला जाईल.
पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यानंतर यात्रेचा चौथा टप्पा झारखंडमध्ये असणार आहे. त्यानंतर येथून यात्रा ओडिशात दाखल होईल. ही यात्रा ओडिशामार्गे छत्तीसगडला जाणार आहे. पाचव्या टप्प्यात ही यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येणार असून त्यानंतर ती तेलंगणात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल. सहाव्या टप्प्यात ही यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात आणि नंतर मध्य प्रदेशातून राजस्थानला जाणार आहे. सातव्या टप्प्यात ही यात्रा हरयाणामध्ये जाणार आहे. यानंतर १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी पसमांदा स्नेह संवाद यात्रेची सांगता होईल.
याचबरोबर, या यात्रेदरम्यान पसमांदा मुस्लीम समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. यात्रेदरम्यान या समाजातील प्रबुद्ध व्यक्ती, महिला व मुलींशी संवाद साधला जाणार आहे. तसेच, या यात्रेत अनेक छोट्या-मोठ्या सभांचे आयोजन सुद्धा केले जाणार आहे, असेही भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सय्यद यासिर अली जिलानी यांनी सांगितले.
'पसमांदा मुस्लीम' म्हणजे कोण?
पसमांदा हा फारसी शब्द असून, जे मागे राहिलेत असा त्याचा अर्थ होतो. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर असे मुस्लिम लोक जे समुदायातील इतर वर्गांच्या तुलनेत पिछाडलेले आहेत. हा पसमांदा समाज मागे राहण्यामागे जातिव्यवस्था हे एक कारण सांगितले जाते. अगदी सुरुवातीच्या काळात पसमांदा शब्दाचा वापर एका वर्गासाठी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वर्षानुवर्षे हा शब्द मुस्लिमांमधील इतर मागास जाती, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वापरात आला.