विरोधकांना शिंगावर घेण्यास भाजपा सज्ज

By admin | Published: April 5, 2015 02:23 AM2015-04-05T02:23:29+5:302015-04-05T02:23:29+5:30

भूसंपादन विधेयकावर सरकारची एकजुटीने कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी विरोधकांना शिंगावर घेण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे.

The BJP is ready to take the opponents to the throne | विरोधकांना शिंगावर घेण्यास भाजपा सज्ज

विरोधकांना शिंगावर घेण्यास भाजपा सज्ज

Next

मुद्दा भूसंपादनाचा : राष्ट्रीय कार्यकारिणीत आडवाणींची ‘नाही मी बोलत’ची भूमिका
बंगळुरू: भूसंपादन विधेयकावर सरकारची एकजुटीने कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी विरोधकांना शिंगावर घेण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. त्यासाठी देशभरातील गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना या विधेयकाच्या सर्व पैलूंची माहिती देण्याच्या मोहिमेची घोषणा भाजपाने शनिवारी येथे केली.
भूसंपादन विधेयकावरून राज्यसभेत कोंडी झालेल्या भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप करताना याच विषयावर आक्रमक धोरण स्वीकारले. परंतु ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विनंतीनंतरही ‘नाही मी बोलत’ची भूमिका कायम ठेवल्याने भाजपाची कुचंबणा झाली. अर्थात त्यातून ज्येष्ठांना अडगळीत टाकण्याची भाजपातील नवनेतृत्वाची नीतीही स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपाच्या दिवशी, शनिवारी वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर सविस्तर चर्चा झाली. पक्षाने मंजूर केलेल्या राजकीय ठरावांमध्येही त्याचा समावेश करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला अनुमोदन दिले. भूसंपादन विधेयकाच्या समर्थनात बैठकीत एक पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करण्यात आले आणि ‘अपप्रचाराचा सामना करण्यासाठी सूचना : लोकांसमक्ष वस्तुस्थितीचे सादरीकरण’ या विषयावरील पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली.
विधेयकावर गंभीर आक्षेप घेणारे सरकारचे मित्रपक्ष शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल यांच्याशीही संपर्क केला जाणार असून सर्वांना सोबत घेऊन चलण्याचा भाजपाचा इरादा आहे. कोणाला नाराज करण्याची इच्छा नाही, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने (संपुआ) आपल्या मर्जीतील लोकांना कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप केले होते. त्यावेळी याच्या सामाजिक परिणामांचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल त्यांनी काँग्रेसवर लक्ष्य साधून केला. विधेयकात काहीही शेतकरी विरोधात असल्यास आम्ही या मुद्यांवर सर्वांसोबत चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु यात एकही तरतूद शेतकरीविरोधी नाही असे आमचे मत आहे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)


‘विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्यात येईल. गावागावांमध्ये जाऊन लोकांना हा कायदा शेतकरी आणि लोकांच्या हिताचा असल्याबाबत खात्री दिली जाईल. पक्षाचा प्रत्येक सदस्य या कामात सहभागी होणार असून शेतकऱ्यांना सहकार्य करणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे.’
निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या

पक्षातील बदलत्या समीकरणांची ही एक झलक आहे. सर्वसामान्यपणे अशाप्रकारच्या बैठकींमध्ये समारोपाला आडवाणी यांचे मार्गदर्शन होत असते. पक्षाच्या वतीने यासंदर्भात कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. परंतु आडवाणी यांना गेल्या काही काळापासून पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यात आले आहे. त्यांनी भाषण दिल्यास ते आपली नाराजी व्यक्त करतील अथवा पक्षाच्या ध्येयधोरणावरही टीका करतील. यामुळे पक्षाला नाचक्की सहन करावी लागेल,अशी शंका दोन दिवसांपासून व्यक्त केली जात होती. तशातच त्यांना भाषणाची प्रत दाखविण्यास सांगितल्यानेही ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे.



आडवाणींचा भाषणास नकार
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे भाषण अखेर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेच नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी विनंती केल्यानंतरही त्यांनी मार्गदर्शन करण्यास नकार दिल्याचे समजते.

Web Title: The BJP is ready to take the opponents to the throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.