२०१९-२० मध्ये भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; फ्यूचर गेमिंगचा ८०% निधी ‘द्रमुक’ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 05:49 AM2024-03-18T05:49:23+5:302024-03-18T05:50:06+5:30
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ‘भाजप’ने ६ हजार ९८६.५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘द्रमुक’ला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एकूण ६५६.५ कोटी रुपये मिळाले असून, त्यात फ्यूचर गेमिंगने दिलेल्या निधीचा वाटा ८० टक्के आहे. ‘फ्यूचर गेमिंग’ने जानेवारी २०२४ पर्यंत एकूण १ हजार ३६८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्टेट बँकेने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ३७ टक्के निधी ‘द्रमुक’च्या वाट्याला गेला आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ‘भाजप’ने ६ हजार ९८६.५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले. २०१९-२० सालात भाजपला सर्वाधिक २५५५ कोटी रुपयांची देणगी मिळाली. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने १ हजार ३९७ कोटी, काँग्रेसने १ हजार ३३४.३५ कोटी, भारत राष्ट्र समितीने १ हजार ३२२ कोटी, शिवसेनेने ६०.४ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवल्याचे समोर आले आहे.
३० टप्प्यांमध्ये योजना
- रोख्यांची योजना १ मार्च २०१८ पासून एकूण ३० टप्प्यांमध्ये राबविण्यात आली. प्रत्येक टप्प्यात रोखे खरेदीसाठी १० दिवसांची, वटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली.
- देणगीदार वर्षातून चार वेळा रोखे खरेदी करू शकत होते. त्यापैकी ९ एप्रिल २०१९ पासून ३० जानेवारी २०२४ पर्यंतच्या २२ टप्प्यांत खरेदी केलेल्या आणि वटवलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती आयोगाने १४ मार्च २०२४ रोजी जाहीर केली होती.
पुन्हा याचिका
१ मार्च २०१८ ते ११ एप्रिल २०१९ दरम्यान खरेदी केलेले निवडणूक रोखे उघड करण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, योजना सुरू झाल्यापासून संपूर्ण कालावधीसाठी मतदारांना राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या जाणून घेण्याचा अधिकार आहे.