भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:01 AM2024-08-26T11:01:12+5:302024-08-26T11:01:44+5:30
Jammu & Kashmir assembly elections : विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून तिकीट मिळालेले नाही.
Jammu & Kashmir assembly elections : नवी दिल्ली : पाच वर्षानंतर जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून तिकीट मिळालेले नाही. २०१४ मध्ये बिलवार विधानसभा मतदारसंघातून निर्मल सिंह विजयी झाले होते. तसेच, या यादीत काश्मीर खोऱ्यातील दोन जागांवर भाजपने काश्मिरी पंडित यांना उमेदवारी दिली आहे. वीर सराफ यांना शांगस-अनंतनाग पूर्व आणि अशोक भट्ट यांना हब्बाकडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, मुद्दे, उमेदवारांची नावे आणि नरेंद्र मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, या बैठकीनंतर आज भाजपकडून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
BJP releases a list of 44 candidates for the upcoming Jammu & Kashmir assembly elections
— ANI (@ANI) August 26, 2024
Arshid Bhat to contest from Rajpora, Javed Ahmad Qadri to contest from Shopian, Mohd. Rafiq Wani to contest from Anantnag West. Adv. Syed Wazahat to contest from Anantnag, Sushri Shagun… pic.twitter.com/s7dXVe8Fdm
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या ९० सदस्यीय विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
पक्षांतराचे वारे
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर या भागातील राजकीय वातावरणात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर निष्क्रिय झालेले अनेक राजकीय नेते आता नव्या पक्षांमध्ये सामील होत आहेत. ताज्या घडामोडीत अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीर अपना पार्टीचे संस्थापक सदस्य जफर इक्बाल मन्हास यांनी राजीनामा दिला असून ते मुलासह काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे.