माझी हत्या झाल्यास भाजपा जबाबदार- तेज बहादूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:58 PM2019-05-07T14:58:49+5:302019-05-07T15:03:56+5:30
या व्हिडीओमध्ये भाजपावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतूनलोकसभा निवडणूक अर्ज दाखल करणारे माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी फेसबुकला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, भाजपा माझ्या हत्येचा कट रचत आहे. तत्पूर्वी तेजबहादूर यादवाचा एक कथित व्हिडीओ समोर आला होता. मला 50 कोटी रुपये दिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करेन, असं त्या व्हिडीओ क्लिपमध्ये ते बोलताना दिसतायत.
टाइम्स नाऊ या वृत्तसंस्थेनं तेज बहादूरचा हा कथित व्हिडीओ करून यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु त्या व्हिडीओच्या सत्यतेची अद्याप खातरजमा झालेली नाही. त्यावर तेज बहादूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहे. दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ एडिट करून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जातंय. माजी बीएसएफ जवान तेज बहादूरनं फेसबुक लाइव्ह करत म्हणाले, भाजपाला वाटतंय की, मोदींचा पूर्वांचलमध्ये पराभव होईल, त्यामुळेच भाजपानं हे नवं षड्यंत्र रचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने मागितलेले सर्व पुरावे आम्ही दाखल केले होते, तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे तेजबहादूर यांनी म्हटले आहे.तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदींनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला होता.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली होती. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. परंतु तेज बहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं सपा-बसपाला धक्का बसला आहे.
वाराणसीची लढाई सर्वोच्च न्यायालयात; प्रशांत भूषण मांडणार तेजबहादूर यांची बाजू https://t.co/6K9ruCRuzI#LokSabhaElections2019#TejBahadurYadav
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2019
2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. तेज बहादूर यांचे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं.