अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:57 AM2019-05-26T03:57:01+5:302019-05-26T03:57:22+5:30
६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली.
इटानगर : ६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली.
भाजपच्या तीन उमेदवारांविरोधात कोणीच उभे न राहिल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात ५७ जागांसाठीच निवडणूक घेण्यात आली. जनता दल (युनायटेड) या पक्षाने सात, नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच, काँग्रेसने चार, पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशने (पीपीए) एक व अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत. या राज्यातील दापोरिजो, डुम्पोरिजो, रागा या तीन मतदारसंघांतील मतमोजणीस उशीर झाला होता.
निवडणूक अधिकारी कोणाकडेही सूत्रे न देताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर गेले होते. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणीत सातत्य राहिले नाही.
>तीन महिला जिंकल्या
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत फक्त तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये गुम तायेंग, दासांग्लू पूल, जुम्मूम इते देवरी यांचा समावेश आहे. यंदा राज्यात विविध पक्षांनी एकूण ११ महिला उमेदवारांना तिकीट दिले होते.