भाजपा सर्वात श्रीमंत, काँग्रेस मात्र घाट्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:37 AM2018-04-11T04:37:36+5:302018-04-11T04:37:36+5:30
देशातील सात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७च्या प्राप्तिकर विवरणपत्रांवरून दिसून येते.
नवी दिल्ली : देशातील सात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७च्या प्राप्तिकर विवरणपत्रांवरून दिसून येते. उत्पन्नाच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भाजपाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत असला तरी उत्पन्नाहून खर्च अधिक असल्याने हा पक्ष घाट्यात असल्याचेही स्पष्ट होते.
या राजकीय पक्षांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांचे विश्लेषण करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म््स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने एक तौलनिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या वर्षी भाजपाने १,०३४.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले. सर्व पक्षांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार केला तर त्यातील एकट्या भाजपाचा वाटा ६६.३४ टक्के आहे.
काँग्रेसला गेल्या वर्षी एकूण २२५.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले तर या पक्षाने ३२१ कोटी रुपयांचा खर्च केला. याउलट बहुजन समाज पक्षाचे (बसपा) ७० टक्के, भाजपाचे ३१ टक्के तर भारतीय कम्युन्स्टि पक्षाचे सहा टक्के उत्पन्न वर्षअखेर खर्च न होता शिल्लक राहिले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.
गेल्या वर्षी या सात राजकीय पक्षांनी मिळून १,५५९.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न व एकूण १,२२८ कोटी रुपयांचा खर्च जाहीर केला. या पक्षांच्या उत्पन्नात ऐच्छिक देणग्यांचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ७४ टक्के (१,१६९ कोटी रु.) होता. त्याखालोखाल बँकांमधील ठेवींवरील व्याज (१२८ कोटी रु.) व कूपन विक्री (१२४ कोटी रु.) यातून या पक्षांना प्रमुख उत्पन्न मिळाले.
या अहवालातून समोर आलेली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी भाजपाचे उत्पन्न ४६४ कोटी रुपयांनी (८१ टक्के), बसपाचे उत्पन्न २१६ कोटी रुपयांनी (२६६ टक्के) तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्पन्न सुमारे नऊ कोटी रुपयांनी (८८ टक्के) वाढले. काँग्रेसचे उत्पन्न मात्र ३६ कोटी रुपयांनी (१४ टक्के) घटले. अशीच घट तृणमूल काँग्रेस (८१ टक्के) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (६ टक्के) उत्पन्नातही दिसून आली.
राजकीय पक्षांनी त्यांचा लेखा परीक्षण केलेला ताळेबंद निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची अखेरची मुदत ३० आॅक्टोबर २०१७ ही होती. भाजपाने ९९ दिवस तर काँग्रेसने १३८ दिवस विलंबाने हिशेब सादर केले. सात प्रमुख पक्षांपैकी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे चार पक्ष गेली सलग पाच वर्षे विलंबाने हिशेब सादर करत आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
>जमा-खर्चाच्या प्रमुख बाबी
भाजपाला सर्वाधिक ९९७ कोटी रुपयांचे उत्पन्न (९६ टक्के) ऐच्छिक देणग्यांमधून मिळाले. पक्षाने यापैकी सर्वाधिक ६०६ कोटी रुपये प्रचारावर खर्च केले तर प्रशासकीय कामांवर ६९.७८ कोटी रुपयांचा कर्च केला.
कूपन विक्रीतून मिळालेले ११५ कोटी रुपये हे काँग्रेसचे उत्पन्नाचे सर्वात प्रमुख (५१ टक्के) साधन होते. पक्षाने निवडणूक प्रचारावर १४९ कोटी रुपये व प्रशासकीय व्यवस्थेवर ११५ कोटी रुपये खर्च केले
>भारतीय जनता पार्टी
एकूण उत्पन्न-१,०३४.२७ कोटी रु.
एकूण खर्च- ७१० कोटी रु.
शिल्लक- ४६४ कोटी रु.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एकूण उत्पन्न- २६१.५६ कोटी रु.
एकूण खर्च- ३२१.६६ कोटी रु.
घाटा- ९६ कोटी रु.