उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम; केशव प्रसाद मौर्य यांची योगींवर पुन्हा टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:35 AM2024-07-30T05:35:26+5:302024-07-30T05:36:02+5:30
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात.
राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगी आणि राज्यातील दोन उपमुख्यमंत्री यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वालाही हे ठाऊक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यानंतर, उत्तर प्रदेशमध्ये आता सर्व ठीक आहे, असे मानले जात होते. परंतु, सोमवारी भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
नेमके काय म्हणाले...
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, नेहमी पक्षच निवडणूक लढवतो आणि पक्षच जिंकतो. भाजप सरकारच्या तमाम मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते की, ते मुख्यमंत्री होणार आहेत. आम्ही सरकारमध्ये नव्हतो तेव्हा जिंकलो. पण, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात.