“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी TMC ने ममता बॅनर्जींना PM पदाचा उमेदवार घोषित करावे”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 11:05 AM2021-11-24T11:05:04+5:302021-11-24T11:07:29+5:30
ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा असतील की नाही, ही नंतरची गोष्ट आहे, असा टोला भाजपने लगावला आहे.
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपला चितपट करत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्याकडे विरोधकांचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. अशातच आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे.
पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा असतील की नाही, ही नंतरची गोष्ट आहे. त्याआधी तृणमूल काँग्रेसने सर्वप्रथम ममता बॅनर्जी या आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार असतील, अशी अधिकृतरित्या घोषणा करावी. याबरोबर तृणमूल काँग्रेसने विरोधी पक्षांची मते घ्यावीत. विरोधकांसह अन्य पक्षाचे नेते ममता बॅनर्जी यांना विरोधकांचे चेहरा मानतात की नाही, हे तृणमूल काँग्रेसला आपोआप कळेल, अशी खोचक टीका मुजूमदार यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी हेच भाजपचे उमेदवार आणि चेहराही
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहराही आहेत आणि २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवारही आहेत. ही बाब निश्चित आहेत. तृणमूल काँग्रेसने आपली भूमिका आधी स्पष्ट करावी, असेही मुजूमदार यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे हे स्वाभाविक आहे. प्रत्येक मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांकडून राज्याच्या विकासासाठी मदत मिळावी, चर्चा व्हावी, यासाठी दिल्लीला जात असतात, असे मुजूमदार यांनी सांगितले.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ममता बॅनर्जी यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीत ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात वाढ आणि त्रिपुरामध्ये होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दिल्ली दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटतील आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षावर टीका करण्यासाठी रणनीती आखतील. संसदेत टीएमसीची रणनीती ठरवण्यासाठी ममता बॅनर्जी पक्षाच्या खासदारांसोबतही बैठक घेणार आहेत, अशी माहिती टीएमसीकडून देण्यात आली आहे.