"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 07:55 PM2024-04-29T19:55:35+5:302024-04-29T19:56:34+5:30
ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा (यूसीसी) मुद्दा उपस्थित केला आहे. ही भाजपची राजकीय खेळी असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, यूसीसीचा हिंदूंना काहीही फायदा होणार नाही. एवढेच नाही तर, मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत पराभवाच्या भीतीमुळे भाजपने विभाजनाच्या रणनीतीचा सहारा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.
ममता म्हणाल्या, “जेव्हा-जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा-तेव्हा ते सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी एखादा मुद्दा काढतात. आता ते UCC बद्दल बोलत आहेत आणि प्रचार करत आहेत की हे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात आहे. मात्र, हे UCC राजकीय विधानांशिवाय काही नाही आणि त्यात हिंदू नाहीत. देशभरात भाजपविरोधी भावना वाढत आहे, जे मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर स्पष्ट झाले आहे."
‘भाजप भयभीत’ -
"पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाचा पॅटर्न आणि टक्केवारी पाहता, भाजपचा पराभव झाल्याचे आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. उर्वरित पाच टप्प्यातही त्यांना पराभवाचाच सामना करावा लागणार आहे. भाजपमध्ये भीती आणि घबराट पसरली आहे," असे ममता म्हणाल्या.
यावेळी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील भाजप नेत्यांवर राज्यात जवळपास 26,000 शालेय नोकऱ्या रद्द करण्यात सहभागी असल्याचा आरोपही केला. त्या म्हणाल्या, “जर कुणी चूक केली असेल तर ती सुधारली जाऊ शकते. मात्र 26,000 नोकऱ्या हिरावणे योग्य नाही. ही भाजपची चाल आहे. ज्या भाजपने आपल्या नोकऱ्या हिरावल्या आहेत, त्या भाजपला मतदान करू नका.”