अक्षय कुमारचे 2 चित्रपट नमो टीव्हीवर? भाजपानं निवडणूक आयोगाकडे मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 08:39 AM2019-05-03T08:39:38+5:302019-05-03T08:39:50+5:30
अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतल्यानंतर भाजपानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीवर अक्षय कुमारचे दोन चित्रपट दाखवण्याची परवानगी मागितली आहे.
नवी दिल्लीः अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतल्यानंतर भाजपानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीवर अक्षय कुमारचे दोन चित्रपट दाखवण्याची परवानगी मागितली आहे. भाजपानं अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा नमो टीव्हीवर प्रसारित करण्याची परवानगी मागितली आहे. दिल्ली निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागवली आहे की, सेन्सॉर बोर्डाद्वारे प्रमाणित केलेले चित्रपट दाखवता येतील.
दिल्लीतल्या निवडणूक आयोगानं सांगितलं की, आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागवली आहे. दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेलं आहे. अशातच निवडणूक आयोग काय भूमिका घेतो हे पाहावं लागणार आहे.
भाजपानं आतापर्यंत निवडणूक आयोगाला 308 अर्ज पाठवले आहेत. काँग्रेसनं 120 अर्ज आणि आपनं 23 अर्ज केले आहेत. भाजपानं आपल्या घोषणापत्रात महिलांच्या स्वास्थ्य सुविधांवर विशेष जोर देण्याचंही आश्वासन दिलं आहे. महिला आणि मुलींना स्वस्तात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पॅडमॅन या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील एक सामाजिक कार्यकर्ता अरुणाचलम मुरुगनाथमच्या जवळपास फिरते. पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा नमो हे चित्रपट स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहेत.