भाजपच्या वरिष्ठांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले, योगींच्या आजी-माजी मंत्र्यांचा अखेर घटस्फोट; 10 वर्षांपासून बिनसलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:50 AM2023-04-04T10:50:13+5:302023-04-04T10:50:48+5:30
राजकारण जसे बदलत जाईल तसे ते एकत्र येत पुन्हा वेगळे होत होते. दोघांमधील वाद कोणापासून लपून राहिले नव्हते.
उत्तर प्रदेशमध्ये एक राजकीय दृष्ट्या हाय प्रोफाईल असलेल्या आजी माजी मंत्र्यांचा घटस्फोट झाला आहे. योगी सरकारमध्ये परिवाहन मंत्री दयाशंकर सिंह आणि आधीच्या सरकारमधील माजी मंत्री स्वाती सिंह यांचे २२ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. परंतू, अखेर या दोघांचा घटस्फोट झाला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून दोघांमध्ये बिनसलेले होते. दयाशंकर आणि स्वाती यांचे लग्न १८ मे २००१ ला झाले होते. परंतू १२ वर्षांतच दोघांमध्ये बिनसले होते. यामुळे दोघांमधील वाद कोणापासून लपून राहिले नव्हते. गेली १० वर्षे ते पती-पत्नी जरूर होते पण वेगवेगळे राहत होते. राजकारण जसे बदलत जाईल तसे ते एकत्र येत पुन्हा वेगळे होत होते.
स्वाती यांनी २०१२ मध्येच घटस्फोटसाठी दावा दाखल केला होता. परंतू तो फेटाळण्यात आला होता. आता २०२२ मध्ये पुन्हा अर्ज केला होता. तो माघारी घेऊन नवीन याचिकाच दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयात अनेकदा बोलवूनही दयाशंकर आले नाहीत यामुळे स्वातीच्या साक्षीदारांचा जबाब घेऊन कोर्टाने घटस्फोटाचा निर्णय दिला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दयाशंकर मुलांना अधून मधून भेटत असतात.
मायावतींनी एक केले...
गेल्या दशकभरापासून दोघे वेगळे झाले आहेत. दयाशंकर यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते, तेव्हा त्यांच्या मदतीला स्वाती आल्या होत्या. या काळात पुन्हा त्यांच्यात चांगले संबंध बनले होते. परंतू २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दयाशंकर यांना तिकीट न देता स्वाती यांना दिल्याने पुन्हा बिनसले होते. स्वाती या योगी सरकारमध्ये मंत्री झाल्या. पाच वर्षांनी दयाशंकर यांनी स्वाती यांचे तिकीट कापले आणि आपण मंत्री झाले. स्वाती यांनी या काळात अनेकदा मारहाणीचे आरोप केले आहेत. या दोघांमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.