शिवसेना, राष्ट्रवादीचे १२-१६ खासदार भाजपाच्या गळाला?; राज्यातील भाजपा नेत्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 11:32 AM2017-09-13T11:32:16+5:302017-09-13T11:32:16+5:30
काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई, दि. 13- काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजपा नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. देशात ‘भाजपामध्ये आपलं स्वागत आहे’ असं खुलं निमंत्रणही भाजपाच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेते चर्चेतील नेत्यांचं स्वागतही करताना दिसत आहेत. इतर पक्षात नाखुशअसलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असं एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.
पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपात प्रवेश करण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपाची दारं नेहमी खुली आहेत, असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. राज्यातील इतर पक्षांच्या जवळपास १५ आमदारांची भाजपाशी बोलणी सुरू आहेत, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे नेते सारंग कामटेकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, असंही ते म्हणाले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल, असं राजकीय विश्लेषक माधव सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. राज्यातील ४८ पैकी ३५ जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्यात येतील, असं नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यात युती झाल्यास २५ पेक्षा जास्त जागा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे भाजपाचं म्हणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.