बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 01:02 PM2019-06-16T13:02:52+5:302019-06-16T13:07:33+5:30
नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे.
मुंबई - मागील पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आजअखेर मुहूर्त मिळाला. हा मंत्रीमंडळविस्तार विकासाच्या दृष्टीने कमी आणि पक्षाची कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठीच सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदे आली. मात्र ही मंत्रीपदे बाहेरून आलेल्या नेत्यांनाच मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत नेते बाजुला पडल्याची चर्चा रंगत आहे.
नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे. अर्थात जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीला हा एक इशारा मानला जात आहे.
बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबियांची पकड आहे. एक मुंडे भाजप तर दुसरे मुंडे राष्ट्रवादीत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे भाजपचा गड सांभाळतात तर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होती. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. तर दोन कॅबिनेटमंत्रीपदे मिळाल्यामुळे बीड जिल्ह्याला देखील फायदाच होणार आहे.
बीडमध्ये भाजपचे पाच आमदार असून जयदत्त क्षीरसागर हे एकमेव राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्व करत होते. मात्र तेच शिवसेनेत दाखल झाल्याने बीडमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये अनेक वर्षांची युती तोडून भाजप-शिवसेना स्वबळावर लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास, शिवसेनेकडून ही पर्यायी व्यवस्था मानली जात आहे.