भाजपाला राममंदिर हवे, तर वटहुकूम काढावा - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:11 AM2018-11-19T04:11:38+5:302018-11-19T04:13:54+5:30
अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर व्हावे असे भाजपाला मनापासून वाटत असेल, तर अजिबात वेळ न दवडता केंद्र सरकारने त्यासाठी लगेच वटहुकूम काढावा, असे आग्रही प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यात चालढकल केली तर केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारे रामंदिरासाठी उत्सुक नाहीत, असा त्याचा अर्थ होईल, असेही ते म्हणाले.
‘तुम्हाला राममंदिर बांधायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा, मग आम्ही ते बांधू’, असा भाजपाला इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी स्वत: अयोध्येला जायचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खासदार राऊत बोलत होते. अयोध्येत राममंदिर उभे राहणे हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. करोडो लोकांची ती मनापासूनची भावना आहे. याच भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भाजपा सत्तेत आली आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे मूळ स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी सरकारला वटहुकमाचा मार्ग अनुसरता येतो. मग राम मंदिरासाठी तोच मार्ग अनुसरताना सरकार का मागे हटते?
न्यायालयातील प्रकरण लवकर संपून राममंदिर बांधले जाईल, असे काही दिसत नाही. वटहुकूम आणला तर लोकसभेत १०० हून अधिक व राज्यसभेतही बरेच भाजपेतर खासदार त्यास पाठिंबा देतील.
या प्रकरणाचा निर्णय २०१९ पर्यंतच व्हायला हवा. त्यानंतर राममंदिर व बाबरी मशीद हा विषय कोणत्याही पक्षाचा अजेंडा असता कामा नये किंवा त्यावर निवडणुकाही लढविल्या जाऊ नयेत. आम्हाला श्रेय नको. ते तुम्ही घ्या; पण राममंदिर बांधा. -संजय राऊत, राज्यसभा सदस्य, शिवसेना