भाजपने मुस्लिमांना उमेदवारी देऊन सद्भावना दाखवावी, अल्पसंख्याक विभागाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:25 AM2017-11-01T01:25:55+5:302017-11-01T01:26:03+5:30
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी देऊन खरी सद्भावना दाखवावी, अशी मागणी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी देऊन खरी सद्भावना दाखवावी, अशी मागणी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी व अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी २०११ मध्ये सद्भावना मोहीम उघडली होती. तथापि, त्यानंतर लगेच वर्षभरात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये २०१० मध्ये भाजपने अनेक मुस्लिमांना उमेदवारी दिली होती व त्यापैकी अनेक जण विजयी झाले होते.
१९८० नंतर भाजपने १९९८ मध्ये केवळ एका ठिकाणी मुस्लिम व्यक्तीस विधानसभेची उमेदवारी दिली होती. आता खरी सद्भावना दाखवण्याची वेळ आली आहे, असे नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने अनेक जागा मागितल्या आहेत. महेबूब अली चिश्ती हे मोर्चाचे प्रमुख असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१५ च्या स्थानिक निवडणुकांमध्ये सुमारे ३५० मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यातील काही उमेदवार विजयी होऊ शकतील.