दक्षिण भारतात भाजपला मर्यादाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:31 AM2019-05-26T04:31:12+5:302019-05-26T04:32:42+5:30
दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत;
- वसंत भोसले
देशाच्या अनेक राज्यांत मोदी लाट आली असताना दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत; शिवाय मित्रपक्षांचाही दारुण पराभव झाला आहे. कर्नाटक या एकमेव राज्यानेच मोदी लाटेत उडी घेतली आहे. याउलट प्रादेशिक पक्षांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत अनेक वर्षांपासून प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. तमिळनाडूत तर ५२ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा पराभव झाला आहे तेव्हापासून द्रविड मुनेन कळघम किंवा अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता येते. लोकसभेच्या निवडणुकीत याच पक्षांना यश मिळते. या पक्षांबरोबर राष्ट्रीय पक्षांना जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत १३२ लोकसभेचे मतदारसंघ आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांना यापैकी ९० जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना अनुक्रमे २२ आणि २० जागा मिळाल्या होत्या.
तमिळनाडूमध्ये सत्तारूढ अण्णा द्रमुक-भाजप या युतीला केवळ एकच जागा मिळाली. द्रमुक पक्षाने काँग्रेस, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच पीएमके, आदी पक्षांबरोबर महागठबंधन केले होते. या महागठबंधनने ३८ पैकी ३७ जागा जिंकल्या. त्यामध्ये द्रमुकला २२, काँग्रेस आठ, तर डाव्या पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत.
कर्नाटकात भाजपने मुसंडी मारत आपलाच पक्ष प्रथम क्रमांकावर आहे, हे सिद्ध केले आहे. राज्यात गतवर्षी सत्तेवर आलेल्या काँग्रेस जनता दल आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. भाजपने २५ जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि जनता दलास प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, आदींचा पराभव झाला आहे. भाजपने ही निवडणूक एकतर्फीच जिंकली आहे. एका जागेवर (मंड्या) अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यालाही भाजपचा पाठिंबा होता.
आंध्र प्रदेशात भाजपचा करिष्मा चालला नाही. काँग्रेसही स्पर्धेत राहिली नाही. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना २५ पैकी एकही जागा मिळाली नाही. याउलट सत्तारूढ तेलगू देसम या पक्षाला पर्यायी वायएसआर काँग्रेस या नव्या प्रादेशिक पक्षाचा उदय झाला आहे. तो प्रथम राज्यातही सत्तारूढ होतो आहे. लोकसभेच्या २२ जागा जिंकणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांच्याकडे विधानसभेत बहुमत दिले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या राजकारणाला वेसण घातली गेली आहे.
>काही महिन्यांपूर्वी तेलंगणा विधानसभेची निवडणूक एकतर्फी जिंकणारा तेलंगणा राष्ट्रीय समितीस थोडा धक्का देण्यात विरोधकांना यश आले आहे. समितीला १७ पैकी ९ जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्येचा पराभव झाला आहे. भाजपने एका जागेवरून उडी मारत चार जागा पटकाविल्या आहेत. काँग्रेसला तीन आणि एमआयएमला एक जागा मिळाली आहे. लक्षद्वीप, पुडुचेरी व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशांत प्रत्येकी एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.
>केरळमध्ये सत्तारूढ डाव्या आघाडीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने जोरदार धक्का दिला. २० पैकी १९ जागा या आघाडीने जिंकल्या. त्यात काँग्रेसच्या पंधरा जागांचा समावेश आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून जिंकले. डाव्या आघाडीला तीनच जागा मिळाल्या.
>दक्षिण भारतातील पक्षीय बलाबल
२०१४
राज्य जागा भाजप काँग्रेस प्रादेशिक अन्य
तेलंगणा १७ १ २ ११ (टीआरएस) ३
आंध्रप्रदेश २५ २ - १५ (तेदे) ८ (वायएस) -
तमिळनाडू ३९ १ - ३७ (अण्णा द्रमुक)
केरळ २० - ९ ६ (डावे) ५
कर्नाटक २८ १७ ९ २ (जद) -
लक्षद्वीप १ - - १ (राष्ट्रवादी) -
अंदमान १ १ - - -
पुडुचेरी १ - - १ १
एकूण १३२ २२ २० ७२ १८
>२०१९
राज्य भाजप काँग्रेस प्रादेशिक अन्य
तेलंगणा ४ ३ ९ (टीआरएस) १
आंध्रप्रदेश - - ३ (तेदे) २२ (वायएस)
तमिळनाडू - ८ २२ (द्रमुक) ८
केरळ - १५ ३ डावे २
कर्नाटक २६ १ १ (जद) -
लक्षद्वीप - १ - -
अंदमान - १ - -
पुडुचेरी - १ - -
एकूण ३० ३० ३८ ३३