भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 03:36 PM2024-06-17T15:36:58+5:302024-06-17T15:37:25+5:30
हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत.
BJP News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. दरम्यान, भाजप हायकमांडने या चार राज्यांसाठी नवीन निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, तर अश्विनी वैष्णव सहप्रभारी म्हणून काम पाहतील.
दुसरीकडे, हरियाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी बनवण्यात आले आहे, तर विपलव कुमार देव सहप्रभारी असतील. तसेच शिवराज सिंह चौहान झारखंडचे प्रभारी असतील. त्यांच्या मदतीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि सहप्रभारी म्हून काम पाहतील. यासोबतच जी किशन रेड्डी यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुकीची शक्यता
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 30 सप्टेंबरपूर्वी मतदान होण्याची शक्यता आहे. यानंतर उर्वरित तीन राज्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सर्व 90 जागांवर उमेदवार उभे करू शकते. येथे शेवटची विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झाली होती. भाजप आणि पीडीपीचे युतीचे सरकार स्थापन झाले, पण हे सरकार जून 2018 मध्ये पडले.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र-हरियाणामध्ये निवडणुका
झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. नायबसिंग सैनी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे यावेळी काँग्रेसचेही मनोबल उंचावले आहे. त्यांनी हरियाणात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 5 जागा गमावल्या तर काँग्रेसने 5 जागा जिंकल्या. 2019 मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांना भाजप, आणि अजित पवार गटाची साथ आहे.