भाजपने सुरू केली दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी; AAP विरोधात आखली रणनीती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:48 PM2024-11-04T14:48:50+5:302024-11-04T14:48:59+5:30

फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे.

BJP starts preparations for Delhi assembly elections; Strategy against AAP | भाजपने सुरू केली दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी; AAP विरोधात आखली रणनीती...

भाजपने सुरू केली दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी; AAP विरोधात आखली रणनीती...

Delhi Assembly Election : एकीकडे महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे, तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून भाजप दिल्लीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. येत्या आठवडाभरात राज्य निवडणूक व्यवस्थापन समिती, उमेदवार निवड समिती आणि राज्य कोअर ग्रुप तयार करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक आमदारांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत असून, 10 नगरसेवक आणि माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

नगरसेवक अन् माजी खासदारांना उमेदवारी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप मजबूत पकड आणि चांगली प्रतिमा असलेले नगरसेवक उभे करेल. कालकामधून योगिता सिंग, बाबरपूरमधून मुकेश बन्सल आणि मुंडकामधून गजेंद्र दलाल या तगड्या नगरसेवकांना विधानसभा निवडणुकीत संधी दिली जाऊ शकते. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत ज्या खासदारांचे तिकीट कापले, त्यांनाही विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाऊ शकते.

मित्रपक्षांना जागा मिळणार
माजी खासदार रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा हे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. दिल्ली विधानसभेत भाजप आपल्या मित्रपक्षांना 3 जागा देऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएचा मित्रपक्ष जेडीयूला दिल्लीत दोन जागा आणि एलजेपीला (रामविलास) एक जागा दिली जाऊ शकते. दिल्लीतील सीमापुरी, बुरारी आणि संगम विहार विधानसभा जागा JDU आणि LJP सारख्या आघाडीच्या पक्षांना दिल्या जाऊ शकतात.

अनेक आमदारांना डच्चू मिळणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सध्याच्या 7 आमदारांपैकी बहुतांश आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचे सर्वेक्षण अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिल्लीतील लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अभय वर्मा, गांधीनगरमधून अनिल बाजपेयी, विश्वास नगरचे विद्यमान आमदार ओमप्रकाश शर्मा, गोंडा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय महावर यासारख्या विद्यमान आमदारांच्या जागांचे पक्ष सर्वेक्षण करत आहे.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपणार 
सध्याच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. याआधी कधीही निवडणुका होऊ शकतात. दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

Web Title: BJP starts preparations for Delhi assembly elections; Strategy against AAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.