पश्चिम बंगालमधील पराभवामुळे राज्यातील भाजप बॅकफूटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 05:42 AM2021-05-03T05:42:18+5:302021-05-03T05:42:57+5:30
‘ऑपरेशन लोटस’च्या प्रयत्नांना बसला मोठा धक्का
यदु जोशी
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विजय मिळाल्यानंतर भाजप महाराष्ट्रात ''ऑपरेशन लोटस'' करून सत्ता आणेल असा तर्क दिला जात होता. मात्र तिकडे कमळ कोमेल्याने महाराष्ट्रातील ऑपरेशनलाही मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी पंढरपूरच्या विजयाने भाजपला बळ दिले आहे.
‘पंतप्रधान मोदी आणि विशेषत: फोडाफोडीचे राजकारण करून सत्तासमीकरणे बदलण्याची ताकद राखणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात व्यग्र आहेत. बंगालचा गड एकदा सर केला की ते महाराष्ट्रात लक्ष घालतील’ असे भाजपचे राज्यातील नेते खासगीत सांगत होते. ‘सगळी तयारी झाली; फक्त मुहूर्ताची वाट पाहणे सुरू आहे, २ मे नंतर मुहूर्त निघेल’ , असा दावादेखील केला जात होता पण बंगालमध्ये सत्तास्वप्न धुळीस मिळाल्याने आता लगेच महाराष्ट्रात सत्तेसाठीचे ऑपरेशन करण्याची भाजपच्या श्रेष्ठींची मानसिकता नसेल असे मानले जात आहे.
भाजपचा वारू काही प्रादेशिक पक्षांनी रोखून धरला. ओडिशात नवीन पटनाईक यांनी तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला रोखून धरले आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत चमत्कार केला. राजकीय जाणकारांच्या मते बंगालमध्ये भाजपचा विजय झाला असता तर देशाच्या इतर राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना फोडाफोडीच्या राजकारणाद्वारे कमकुवत करण्याची खेळी भाजपकडून नक्कीच खेळली गेली असती. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गळ टाकण्याची योजना होती.
पवार, पाटील यांना धक्का
महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष एकत्र आणि सोबत सहानुभूतीचा फॅक्टर असे अनुकूल चित्र असतानाही भालके यांचा पराभव झाला. प्रचाराची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीला उभारी
n या विजयात राष्ट्रवादी वा शिवसेनेचा कोणताही वाटा नसला तरी याने राष्ट्रवादी, शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांना नक्कीच उभारी मिळणार आहे.राष्ट्रवादीला पंढरपूरच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे लागेल.
n ममता यांच्या मदतीने प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याचे प्रयत्न शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होवू शकतात. मात्र, या पराभवाने महाविकास आघाडीत परस्परांविषयी शंकेचे वातावरण निर्माण होऊ शकते. भाजप त्याचा फायदा कसा घेऊ शकेल, हे पहायचे.
भाजप नेत्यांना आत्मविश्वास
n या पराभवाने राष्ट्रवादीलाच नव्हे तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विरोधात तीन पक्ष अन् सहानुभूती हे फॅक्टर एकत्र आले तरी आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्वास या विजयाने भाजपजनांना दिला आहे.
n ‘पंढरपूरमध्ये तुम्ही यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रचारसभेत म्हणाले होते.
n बंगालमधील भाजपच्या पराभवाने महाविकास आघाडी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी नवा मुहूर्त शोधण्याची वेळ भाजपवर येऊ शकते.