Bangladesh: “बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने थेट आक्रमण करावे”; BJP नेता आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:10 PM2021-10-19T14:10:50+5:302021-10-19T14:20:07+5:30
Bangladesh: भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली:बांगलादेशात हिंदूंच्या ६६ घरांची नासधूस करण्यात आल्यानंतर जवळपास २० घरे जाळण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. यानंतर भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. यातच आता एका भाजप नेत्याने बांगलादेशवर आक्रमण करावे, असे म्हटले आहे.
बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधल्या हिंदू संघटनांनी अमेरिकेतील बांगलादेश दूतावासासमोर निदर्शने केली. तसेच अजूनही अनेक देशांतील बांगलादेश दूतावासासमोर हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनीही आक्रमक पवित्रा घेत अन्यथा भारताने आक्रमण करावे, असे म्हटले आहे.
...तर भारताने थेट आक्रमण करावे
बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने आक्रमण करावे, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. दोन-तीन दिवसांपासून बांग्लादेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू वस्त्यांना टार्गेट केले जात आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महासचिव मिलिंद परांदे म्हणाले की, रात्रीच्या अंधारात चटगाव येथील कोमिला क्षेत्रात मुद्दामहून षडयंत्र रचले गेले आणि कुराणाचा अपमान झाल्याची अफवा पसरवली गेली. यानंतर हल्लेखोरांनी दुर्गा पूजा मंडळावर हल्ला करत देवी-देवतांच्या मूर्तींची नासधूस केली. तोडफोड केली. यामुळे हिंदू समाज अतिशय दुःखी झाला आहे. हिंदूवरील अत्याचार आणि शोषण कायम असून, यातील घटनांमध्ये वाढ होत आहे, असे परांदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंदिरांवर झालेल्या हल्ल्यात दोन हिंदुंचा मृत्यू झाला असून, या घटनेत सुमारे ५०० जण जखमी झाले. यानंतर बांगलादेशच्या चटगांव विभागातील कुमिला येथील दुर्गा पूजेच्या ठिकाणी निंदा केल्याच्या कथित घटनेनंतर जातीय तणाव वाढला. ज्यामुळे हिंदू मंदिरे आणि कमिल्ला, चांदपूर, चॅटोग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, येथील मंदिरांवर हल्ले झाले.