संपूर्ण भारतात एकत्रित निवडणूक घेण्याच्या विधेयकांना भाजपचा पाठिंबा, विरोधी पक्षांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 06:50 IST2025-01-09T06:48:53+5:302025-01-09T06:50:42+5:30
संसदीय समितीची पहिली आढावा बैठक; दाेन्ही बाजू आमने-सामने

संपूर्ण भारतात एकत्रित निवडणूक घेण्याच्या विधेयकांना भाजपचा पाठिंबा, विरोधी पक्षांचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याबाबतच्या दोन विधेयकांचा आढावा घेण्यासाठी संसदीय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये या विधेयकांचे भाजपच्या खासदारांनी समर्थन केले तर विरोधी पक्षांनी या विधेयकांना विरोध केला. या विधेयकांतील तरतुदींविषयी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीच्या बैठकीत सादरीकरण केले.
काय म्हणाले सत्ताधारी आणि विराेधक?
निवडणुका एकत्रितरीत्या घेण्याच्या संकल्पनेला केंद्रीय विधी आयोगासह विविध संस्थांनी पाठिंबा दिल्याचीही माहिती या बैठकीत देण्यात आली.
- सत्ताधारी : ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना देशाच्या हिताची असल्याचे भाजपच्या सदस्यांनी सांगितले. याच संकल्पनेनुसार ही दोन विधेयके तयार करण्यात आली आहेत.
- विराेधक : काँग्रेसच्या एका सदस्याने संसदीय समितीच्या बैठकीत सांगितले की, एकत्रितपणे निवडणुका घेण्यासंदर्भातील विधेयके ही राज्यघटनेतील तरतुदींपेक्षा विसंगत स्वरूपाची आहेत. या विधेयकांचे कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास जनतेचे हक्क नाकारले जातील, असे तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने सांगितले.
संसदीय समिती : याबाबतच्या दोन विधेयकांचा आढावा घेण्यास ३९ सदस्यांची संसदीय समिती नेमली असून, भाजप खासदार पी. पी. चौधरी अध्यक्ष आहेत.