मणिपूरमध्ये भाजपाचा आज शपथविधी
By admin | Published: March 15, 2017 12:58 AM2017-03-15T00:58:11+5:302017-03-15T00:58:11+5:30
मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला नागा पीपल्स फ्रंटचीही (एनपीएफ) साथ मिळाल्याने एन. बिरेन सिंग यांना उद्या शपथविधीसाठी बोलावण्यात येईल
इम्फाळ : मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला नागा पीपल्स फ्रंटचीही (एनपीएफ) साथ मिळाल्याने एन. बिरेन सिंग यांना उद्या शपथविधीसाठी बोलावण्यात येईल. एनपीएफचे राज्यात चार आमदार आहेत. त्यांनी मंगळवारी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा दर्शविला.
एनपीएफ हा केंद्रात रालोआचा घटक पक्ष आहे. एनपीएफपूर्वी नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) चार आमदारांनी भाजपाला पाठिंबा घोषित केला होता. एनपीएफच्या चार आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दर्शविला, असे राजभवनातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत आपल्याला ३२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपा शिष्टमंडळाने रविवारी २८ आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली होती. भाजपाच्या २१ आमदारांखेरीज ४ एनपीपीचे आमदार, लोजपा आणि तृणमूल काँग्रेसचा प्रत्येकी एक तसेच एका काँग्रेस आमदाराचा समावेश होता. एनपीएफचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही भाजपाने केला होता. तसेच नागा पीपल्स फं्रटच्या अध्यक्षांचे पाठिंब्याचे पत्रही सादर केले होते.
नवे सरकार स्थापन करण्यासाठी एनपीएफ आमदारांचा कोणाला पाठिंबा आहे हे जाणून घेण्यासाठी राज्यपाल व्यक्तिश: त्यांची भेट घेऊ इच्छितात, असे
राजभवनातील सूत्रांनी यापूर्वी म्हटले होते. (वृत्तसंस्था)